AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेततळ्यातील मत्स्यपालन यशस्वी करण्याची सूत्रे!
सल्लागार लेखअ‍ॅग्रोवन
शेततळ्यातील मत्स्यपालन यशस्वी करण्याची सूत्रे!
मत्स्यपालन करताना घ्यावयाची काळजी... १. सिल्पोलिन लायनिंग व तळे तयार करणे :- शेततळ्यामध्ये पाणी टिकून राहण्यासाठी सिल्पोलीन लायनिंग महत्त्वाचे ठरते. सिल्पोलिनची जाडी किमान ५०० मायक्रॉन असावी. तळ्याला एका बाजूला उतार राहील, सिल्पोलीन तळाला नीट दाबून बसेल, याची काळजी घ्यावी. -शेततळ्यात सहज चढउतार करण्यासाठी पायऱ्यांची सोय करावी. कारण तळ्यामध्ये पाणी भरल्यानंतर काही दिवसांतच सिल्पोलिनवर शेवाळ धरते. त्यावरून तलावात उतरणे, चढणे कठीण होते. तळ्यास पाणी आत येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी असलेल्या पाइपना जाळी बसवावी. तळ्याच्या सर्व बाजूंनी ३ फूट उंचीचे शेडनेटचे (७५ टक्के प्रकाश) कुंपण करावे. ते बांधावर ६ इंचापर्यंत आत रोवावे. म्हणजे बेडूक, साप इत्यादी आत शिरणार नाहीत. पावसाळ्यात शेततळी भरून वाहतात. अशा वेळी तळ्यातील मासे बाहेर जाणार नाहीत, याची पूर्ण काळजी घ्यावी. २. मत्स्यपालन पूर्व तयारी :- मासळीचे बीज तलावात सोडण्यापूर्वी उपद्रवी मासे, जाळी मारून तसेच ब्लिचिंग पावडर वापरून काढून टाकावेत. बीज सोडण्याच्या १० दिवस आधी तळ्यात शेणखत ५० किलो, (किंवा कोंबडी खत १८ किलो), युरिया १० किलो आणि सुपर फॉस्फेट १० किलो प्रति १० गुंठे या प्रमाणात टाकावे. पाण्याचा सामू (पीएच) तपासून घ्यावा. पीएच निर्देंशाक द्रावणाच्या साह्याने शेतकरीही तो तपासू शकतो. पाण्याचा सामू ७.० ते ८.२ या दरम्यान असावा. तो कमी असल्यास योग्य तेवढी चुनखडीची मात्रा द्यावी. या सर्व खतांमुळे तळ्यात मासळीचे नैसर्गिक खाद्य (प्लवंग) तयार होते. कटला, रोहू, मृगल, चंदेरा या माशांकरिता हे खाद्य उत्तम. ३. मस्त्यपालनाकरिता माशांची निवड :- आपल्या हवामानात टिकाव धरणारे, जलद गतीने वाढणारे, एकमेकांना त्रास न देणारे व एकमेकांना न खाणारे, तळ्यातील नैसर्गिक खाद्य खाणारे, तसेच कृत्रिम खाद्य सहज स्वीकारणारे आणि बाजारपेठेत चांगली मागणी असणारे मासे पालनाकरिता निवडावे. माशांची बोटुकली (८ ते १० सेमी लांबी) तळ्यात सोडावी. त्यापेक्षा लहान सोडू नये. या माशांची संख्या खालील तक्ता १ प्रमाणे ठेवावी. तीन किंवा चार जातीच्या माशांचे एकत्रित पालन करण्यासाठी तळ्यातील पाण्याची खोली किमान ३ ते ४ मीटर असावी. तक्त्यामध्ये दिलेल्या संख्येपेक्षा अधिक मासे तळ्यात वाढवण्यासाठी तळ्यात सतत हवेचा पुरवठा, काटेकोर खाद्य व्यवस्थापन व पाण्याचा दर्जा सांभाळणे आवश्‍यक असते. ४. मासळी बीज कसे असावे? बहुतांश मत्स्यबीज राज्य शासनाच्या बीजोत्पादन केंद्रातून मिळू शकते. काही चांगल्या खासगी मत्स्यबीजोत्पादन केंद्रातही मिळते. झिंगा, कोळंबीचे बीज पालघर/वसईला मिळते. बीज निरोगी व चपळ आहे, हे पारखून घ्यावे. बीजोत्पादन केंद्रातून कमीत कमी वेळात बीज तळ्यावर आणावे. बीज पाण्याला अनुकूलन/ सवय करून मगच तळ्यात सोडावे. ५. शेततळ्यात माशांचे व्यवस्थापन :- अ) खाद्य व्यवस्थापन ः मत्स्य पालनामध्ये थोड्या जागेत व ठराविक वेळात मासे वाढवायचे असतात. त्यासाठी माशांना नियमितपणे ठरलेल्या वेळी व ठराविक प्रमाणात खाद्य द्यावे. भुईमूग पेंड/सोयाबीन पेंड/सूर्यफूल पेंड यापैकी एक पेंड व भाताची किंवा गव्हाची भुशी हे खाद्य १ः१ प्रमाणात मिसळून, रात्रभर भिजत घालून दुसऱ्या दिवशी छोट्या गोळ्या करून द्यावे. त्याचे प्रमाण तक्ता २ प्रमाणे ठेवावे. तलावाच्या नैसर्गिक उत्पादनाप्रमाणे कमी जास्त करावे. ब) पाणी व्यवस्थापन :- पिकासाठी ज्या प्रमाणे मातीचा पोत सांभाळणे आवश्यक असते, त्याप्रमाणे माशांसाठी पाण्याचा उच्च दर्जा राखावा. पाण्याचा हिरवट रंग शेवाळामुळे न येता सूक्ष्म एकपेशीय वनस्पती (प्लवंग)मुळे आलेला असावा. पाण्याचा सामू कमी झाल्यास योग्य प्रमाणात चुनखडीचे पाण्यात द्रावण करून मग टाकावी. ६. माशांचे उत्पादन व अधिक दरासाठी :- ६ ते ८ महिन्यांत ५०० ते ६०० किलो मासळी प्रति १० गुंठे तळ्यातून मिळेल. सध्याच्या माशांच्या दराप्रमाणे (१५० रुपये किलो) १० गुंठे क्षेत्रातून ७५ हजार ते ९० हजारांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. वर उल्लेखलेली मत्स्यपालनाची पद्धत ही कमीत कमी खर्चाची आहे. यात कृत्रिम खाद्य किंवा हवेचा पुरवठा करणारी यंत्रे यांचा उपयोग करणे अभिप्रेत नाही. या साध्या पद्धतीनेही शेतकऱ्यांना मासळी उत्पादनातून चांगले उत्पन्न मिळू शकेल. मासळी ताज्या स्थितीत तळ्यावर विकल्यास अधिक दर मिळू शकतो. मासळीचे fillet (काप) करून विकल्यास अजून जास्त दर मिळेल. मासळीचे पदार्थ (उदा. आमटी fish curry) विकल्यास प्रतिकिलोस साधारण ७०० रुपये मिळू शकतात. ७. शेततळ्यापासून मासे पकडणे :- तळ्यात ४-५ फूट पाणी असताना फेक जाळे किंवा वढप (ओढायचे जाळे) जाळ्याने मासे पकडता येतात. त्यापेक्षा खोल (१० ते २० फूट) पाण्यामध्ये फसले जाळ्याचा वापर करावा. मत्स्यपालनात हे टाळा...👇 अतिशय लहान आकाराचे बीज (मत्स्य जीरे) तळ्यात सोडू नका. तळ्यावर बीज आणून देणाऱ्या फिरत्या विक्रेत्याकडून मत्स्य बीज घेऊ नका. फसवणूक होईल. सांगितल्या प्रमाणापेक्षा जास्त मत्स्यबीज तलावात सोडू नका. आवश्‍यकतेपेक्षा जास्त खाद्य माशांना देऊ नका. वाया जाईल, शिवाय तळ्याचे पाणी खराब होईल ते वेगळे. माशांना दर नसेल, तर तलावातून मासे काढू नका. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
5