AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
प्रथिने, खनिजांची गरज पूर्ण करण्यासाठी पशुखाद्य
पशुपालनअॅग्रोवन
प्रथिने, खनिजांची गरज पूर्ण करण्यासाठी पशुखाद्य
जनावरांसाठी ज्वारी, बाजरीचा कडबा चारा म्हणून वापरला जातो. काही भागात हा चारा अतिशय निकृष्ट दर्जाचा असतो. जनावरांची प्रथिने आणि खनिजांची गरज पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आहारात पोषक खाद्य घटकांचा समावेश करणे आवश्यक असते. • जनावरांना कुठल्या प्रकारे व कोणत्या दर्जाचा चारा दिला जातो याच्या आधारावर किती प्रथिने आणि ऊर्जा असणारे पशुखाद्य द्यावे लागेल हे ठरवले जाते. • घरच्या घरी उत्तम पशुखाद्य बनवण्यासाठी लागणाऱ्या विविध घटकांची आणि त्यांच्या बाजारातील भावाची माहिती असणे आवश्यक असते. • आवश्यक घटक किंवा शेजारील परिसरात सहज उपलब्ध असणाऱ्या आणि नेहमी आहारात न वापरल्या जाणाऱ्या घटकांची माहिती नसेल, तर कमीत कमी खर्चात पशुखाद्य बनवता येत नाही.
पशुखाद्य बनविण्यासाठी आवश्‍यक खाद्य घटक • ऊर्जा स्रोत ः (३० ते ४० टक्के) मका, बारली, गहू , ज्वारी, ओट इ. • प्रथिने स्रोत ः (२५ ते ३० टक्के) सरकी पेंड, शेंगदाणा पेंड, सोयाबीन इ. • धान्याचे दुय्यम घटक ः (१० ते ४० टक्के) गव्हाचा कोंडा, तांदळाचा कोंडा, तांदळाची कणी, मुगाची चुरी, तुरीची चुरी, मसूर आणि हरभऱ्याची चुरी इ. • उसाची मळी : (७ ते १० टक्के) • मीठ : (१ टक्के) • युरिया : (०.५ ते १.० टक्के) • खनिजे, क्षार मिश्रण : (२ टक्के) पशुखाद्य बनविण्याची पद्धत (१०० किलोसाठी) • प्रथम प्रथिने आणि ऊर्जेचा स्रोत असणारे घटक वेगवेगळे भरडून घ्यावेत. • २५-३० किलो प्रथिने स्रोत आणि ३०-४० किलो ऊर्जा स्रोत एकत्रित करून त्यात धान्याचे दुय्यम उत्पादन मिसळावे. • उसाची मळी चिकट असल्यामुळे काळजीपूर्वक एकत्रित करून घ्यावी. शेवटी युरिया, मीठ आणि खनिज क्षार मिश्रण मिसळावे. • सर्व घटक योग्य पद्धतीने मिसळून एकजीव करावेत आणि हवा बंद पिशवीत कोरड्या जागी ठेवावेत. उत्तम पशुखाद्याची वैशिष्ट्ये • उत्तम पशुखाद्यामध्ये १८ ते २० टक्के प्रथिने आणि ऊर्जेचे ६५ ते ७५ टक्के प्रमाण असावे. • पशुखाद्यातील ओलसरपणा ११ टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. कारण जास्त अोलसर पशुखाद्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. जनावरांना पशुखाद्य देताना... • जनावरांना आहारात हिरवा मका व मुरघास दिला जात असेल, तर पशुखाद्य २५ टक्क्यांनी कमी द्यावे. लुसर्न, बरसीमचा हिरवा चारा जर दिला जात असेल तर पशुखाद्य ५० टक्क्यांनी कमी द्यावे. • पहिले ७ ते ८ दिवस जनावराला पशुखाद्याचे प्रमाण हळूहळू वाढवावे, अन्यथा पचनक्रिया बिघडून पोटातील आम्लाचे प्रमाण वाढते. • जनावराच्या दूध क्षमतेनुसारच प्रकार १, २, ३ असे पशुखाद्य वापरावे. • वाळलेल्या किंवा हिरव्या चाऱ्यासोबत दिल्यास पचनक्रिया सुधारते. • पशुखाद्य नेहमी कोरड्या जागी व जनावरापासून दूर साठवून ठेवावे. संदर्भ –अग्रोवन १० नोव्हे १७
49
0