कृषि वार्ताअॅग्रोवन
हरभऱ्याच्या हमीभावात ३७५ रुपये वाढीची शिफारस
आगामी आर्थिक वर्षासाठी हरभऱ्याच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) प्रतिक्विंटल ३७५ रुपयांनी वाढ करण्याची शिफारस कृषी मूल्य आयागाने केंद्राकडे केली आहे. सध्या हरभऱ्याची एमएसपी प्रतिक्विंटल ३,८०० रुपये आणि त्यावर २०० रुपये अशी आहे.
हरभऱ्यासह मोहरीच्या एमएसपीत प्रतिक्विंटल २५० रुपयांनी वाढ करण्याचीही शिफारस केली आहे. सध्या मोहरीची एमएसपी प्रतिक्विंटल ३,६०० रुपये आणि त्यावर १०० रुपये अशी आहे. दरम्यान, कृषी मंत्रालयाने हरभरा आणि मोहरीच्या एमएसपी वाढीबाबत काही सूचना केलेल्या नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रब्बी हंगामातील एकूण कडधान्य उत्पादनात हरभऱ्याचा ४० टक्के वाटा आहे. तर तेलबिया उत्पादनात मोहरीचा वाटा २० टक्के आहे. गेल्या काही वर्षांत कडधान्ये आणि खाद्यतेलाच्या देशांतर्गत मागणीच्या पूर्ततेसाठी आयात करावी लागत आहे. त्यासाठी कडधान्ये आणि तेलबियांच्या उत्पादनवाढीला प्रोत्साहन दिले जात आहे.
गव्हाच्या एमएसपीत १०० रुपये वाढीचा प्रस्ताव
२०१८-१९ (एप्रिल-मार्च)मधील हंगामासाठी कृषी मूल्य आयागाने गव्हाच्या आधारभूत किमतीत १०० रुपयांनी वाढ करण्याची शिफारस केंद्राकडे केली आहे. याला केंद्राने मान्यता दिल्यास गव्हाची आधारभूत किंमत १,७२५ रुपयांवर पोचणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
संदर्भ- अग्रोवन१२ ऑक्टो १७