कृषि वार्ताअॅग्रोवन
उसाचा नवीन वाण एमएस १०००१
ऊस, साखरेचे अधिक उत्पादन देणारा, लवकर पक्व होणारा, रोग व किडीस कमी बळी पडणारा आणि क्षारपड जमिनीतही चांगला वाढणारा, उत्तम खोडवा येणारा उसाचा नवीन वाण एमएस १०००१ शेतकऱ्यांना फायदेशीरठरणाराआहे.
साखर कारखान्यांना अधिक साखर उतारा देणारे आणि लवकर गाळपासाठी येणाऱ्या उसाचे वाण हवे असतात, तर शेतकऱ्यांना जास्त उत्पादन देणारे वाण हवे असतात. या दोन्हींचा विचार करून पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने एमएस-१०००१ नवीन वाण विकसित केला आहे. सन २०१० पासून या वाणाच्या चाचण्या महाराष्ट्रात पाडेगाव, कोल्हापूर, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे आणि प्रवरानगर येथे घेण्यात आल्या.
सर्व ३३ चाचण्यांमध्ये या वाणाचे को एम ०२६५, को-८६०३२ आणि व्हीएसआय ४३४ वाणांपेक्षा २.०९, ११.३१ आणि ३२.७४ टक्के व साखरेचे उत्पादन ९.०४, ११.३१ आणि ३२.७४ टक्के अनुक्रमे जास्त मिळाले.
• हा वाण कोएम ०२६५ (फुले २६५) आणि एमएस ०६०२ या वाणांच्या संकरातून पैदास केलेला आहे. महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त कृषी संशोधन व विस्तार परिषदेच्या मे २०१७ मध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा वाण महाराष्ट्रात सुरू व पूर्व हंगाम लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे.
• सप्टेंबर, २०१७ मध्ये ऊस पैदास संस्था, कोईमतूर (तामिळनाडू) येथे झालेल्या अखिल भारतीय समन्वित ऊस संशोधन योजनेच्या देशपातळीवरील तांत्रिक चर्चासत्रामध्ये एम. एस. १०००१ या लवकर पक्व होणाऱ्या ( १० ते १२ महिने ) वाणाने ऊस उत्पादन, साखर उत्पादनात दक्षिण भारतातील उष्ण कटिबंधातील सहा राज्यांमध्ये (गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश) प्रथम क्रमांक मिळविला आहे.
वाणाची वैशिष्ट्ये
• लवकर पक्व होणारा वाण (१० ते १२ महिन्यांत)
• गाळपालायक उसाची संख्या (सरासरी १,००,०००/ हे.), जाडी (३.५ सें.मी.) व उसाचे सरासरी वजन (१.५६ किलो) असून हे को-८६०३२ पेक्षा जास्त आहे.
• हेक्टरी सरासरी ऊस उत्पादन (१३७.८८ टन/हे.) आणि साखर उत्पादन (१९.८७ टन/ हे.) मिळते.
• सुरू हंगामात हेक्टरी सरासरी ऊस उत्पादन (१३५.७६ टन/ हे.) व साखर उत्पादन (१९.७५ टन/ हे.) मिळते. पूर्व हंगामात हेक्टरी सरासरी ऊस उत्पादन (१५१.३६ टन/ हे) आणि साखर उत्पादन (२२.०२ टन/ हे.).
• मध्यम ते भारी जमिनीत तसेच खारवट व चोपण जमिनीतही (सामू ८.५ ते ९.५) उत्तम वाढतो. उत्पादनही चांगले मिळते.
• पाचट सहज निघते, त्यामुळे तोडणी करणे सुलभ. पानाच्या देठावर कूस कमी.
• पाने हिरवीगार व तुऱ्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने वाढ्याचा उपयोग चाऱ्यासाठी होतो.
• सुरू व पूर्वहंगाम हंगामासाठी शिफारस, खोडवाही उत्तम येतो.
• चाबूक काणी, मर व लालकुज या रोगांना प्रतिकारक आहे.
• खोड कीड, कांडी कीड, शेंडे कीड व लोकरी मावा या किडींचा कमी प्रमाणात प्रादुर्भाव.
• पाण्याचा ताण सहन करणारा वाण.
• तोडणीस उशीर झाला तरी उसात दशी पडत नाही. त्यामुळे वजन व साखर उताऱ्यात घट नाही.
क्षारपड जमिनीत लागवडीस योग्य
• क्षारपड जमिनीत इतर वाणांच्या तुलनेत चांगला वाढतो. त्यामुळे उत्पन्नही चांगले मिळते.
• पाण्याचा ताण सहन करत असल्यामुळे पाण्याची कमतरता असणाऱ्या भागातही लागवड शक्य.
• खोडव्याची फूट चांगली होऊन उसाची संख्या व प्रत्येक उसाची जाडी एकसारखी मिळते. या वाणापासून ३ ते ४ खोडवे घेणे शक्य. त्यामुळे खर्चात बचत.
संदेभ –अग्रोवन २७सप्ते१७