AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
लसून पिकाची काढणी व साठवण
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
लसून पिकाची काढणी व साठवण
सर्वसाधारणपणे लसणाचे पीक लागवडी नंतर १२० ते १५० दिवसांत काढणीस येते. थंड हवामानात विशेषतः उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाना, राजस्थान, मध्य प्रदेशसारख्या राज्यांमध्ये पिक तयार होण्यास थोडा जास्त कालावधी लागतो. काढणी योग्य पीक कसे ओळखाल ? लसणाच्या गड्ड्यांची पूर्ण वाढ झाल्यानंतर पानांची वाढ थांबते. पाने पिवळी पडतात. तसेच शेंडे वाळतात. जमिनीच्या लगत मानेचा भाग मऊ होऊन पाने जमिनीवर पडतात. मानेमध्ये लहानशी गाठ तयार होते. याला ‘ लसणी फुटणे’ असे म्हणतात. • पाने पूर्ण वाळण्या पूर्वी लसणाची काढणी करावी. लसून लहान कुदळीने किंवा खुरप्याने काढावा. • गड्डे काढल्यानंतर कुदळ किंवा खुरपे लागून फुटलेले गड्डे वेगळे करावेत. तसेच लहान गड्डे प्रतवारी करून वेगळे काढावेत. • काढलेल्या लसणाची पाने आंबट ओली असताना 20 ते ३० सारख्या आकाराच्या गड्ड्यांची जुडी करून पानांची वेणी बांधून घ्यावी. त्यानंतर अशा जुड्या झाडाखाली किंवा बाजू उघड्या असलेल्या छपरीत १० ते १५ दिवस सुकवाव्यात बरेच शेतकरी वेण्या न बांधता पानांची जुडी मानेजवळ घट्ट बांधून पाने मोकळी ठेवतात. जुड्या झाडाच्या सावलीत उभ्या ठेवत सुकवतात. नंतर साठवण गृहात ठेवतात. काही शेतकरी लसून काढल्यानंतर त्याच्या जुड्या बांधून शेतात उभ्या करतात व चारही बाजूंनी माती लावून घेतात. अशा स्थिती मध्ये १० ते १५ दिवस लसून शेतामध्येच सुकवतात. नंतर वळलेली पात कापून गड्डे प्रतवारी करून बारदानाच्या गोण्यात भरून लगेच विक्री साठी पाठवतात.
साठवण लसणाची मागणी कांद्याप्रमाणेच वर्षभर असते. मात्र लसणाचे उत्पादन फक्त रब्बी हंगामामध्ये घेता येते. त्यामुळे लसून साठवून वर्षभर पुरवावी लागतो. म्हणून साठवणुकीत चांगल्या टिकणाऱ्या लसणाच्या जातींची निवड करावी. कांदा व लसून संशोधन संचालनालयाने साठवण क्षमता चांगली असणाऱ्या लसणाच्या भीमा ओमकार व भीमा पर्पल अशा दोन जाती विकसित केल्या आहेत. • काढणी नंतर प्रतवारी करून जुड्या बांधून सुकवाव्यात आणि नंतरच साठवण करावी. • साठविण्या करिता हवादार साठवण गृहांचा वापर करावा. कांद्याच्या चाळीनंतर लसणा साठी साठवण गृहाची रचना असावी. • वेण्या बांधलेला लसून बांबूवर टांगून ठेवल्यास तो चांगला टिकतो. मात्र शेतीमाल जास्त असल्यास लसून कमी मावतो. अशा वेळी लसणाचे ३ ते ४ फूट व्यासाचे व ४ फूट उंचीचे गोलाकार ढीग छापरामध्ये जमिनीवर रचून ठेवतात. ढीग रचताना पाया ४ फूट वरचा भाग ३ फुटांचा करावा म्हणजे ढीग पडणार नाही. लसणाच्या गड्ड्याचा भाग ढिगाच्या बाहेरच्या बाजूवर व पानांचा भाग आतल्या बाजूवर, अशा प्रकारे जुड्या एकमेकांवर गोलाकार रचाव्यात. दोन ढिगांमध्ये फिरण्या इतके अंतर ठेवावे, त्यामुळे हवा खेळती राहते. साठवणी पूर्वी साठवण गृहात कार्बेन्डेझिम ची फवारणी करावी. • अशा पद्धतीने लसणाची साठवण केल्यास तो ५ ते ६ महिन्यापर्यंत चांगला टिकून राहू शकतो. डॉ शैलेंद्र गाडगे (कांदा व लसून संशोधन संचालनालय राजगुरूनगर जि. पुणे) अग्रोस्टार अग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस २६ डिसे
142
1
इतर लेख