पशुपालनअॅग्रोवन
जनावरातील गोचीड तापाचे करा प्रभावी नियंत्रण
गोचीड ताप गाई आणि म्हशींमध्ये आढळणारा आजार असून, गोचिडाच्या माध्यमातून रोगप्रसार होत असतो. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. संकरित गाईंमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात दिसतो.
रोगसाथशास्त्र:
• जुलै ते ऑक्टोबर महिन्यात जनावरांच्या शरीरावर गोचीड खूप जास्त प्रमाणात आढळतात.
• उष्ण व दमट हवामान, इतर रोगाचा प्रादुर्भाव इत्यादी गोष्टी रोगनिर्मितीस मदत करतात.
• विदेशी जनावरांची रोगाचा बळी पडण्याची शक्यता तुलनात्मकदृष्ट्या जास्त असते. सामान्यतः गाई, बैल यांच्या तुलनेत म्हशी प्रतिरोधक असतात.
• सततच्या स्थलांतरणामुळे थकवा जाणवतो व त्यामुळेसुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे आढळून आले आहे.
• सहसा संकरित वासरामध्ये या रोगाचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे प्रादुर्भाव झालेली जनावरे या रोगाला जास्त बळी पडतात
लक्षणे:
• जनावरांच्या शरीराचे तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअस (१०२-१०६ अंश फॅरनहाइट) पर्यंत वाढते.
• नाकातून, डोळ्यांतून पाणी (अश्रू) वाहणे, हृदयाचे जलद स्पंदन, लासिकाग्रंथी (लीम्फ ग्रंथी) आकारमानाने वाढतात.
• रक्तमिश्रित विष्ठा, भूक कमी होणे, रवंथ करणे बंद होते. नाडीचे ठोके जलद होतात. जनावर कृश होत जाते आणि अर्धशयन स्थिती ग्रहण करते.
• श्वसनाला त्रास होतो अाणि श्वसनाचा वेग जलद असतो. शेवटच्या काळात नाकावाटे फेसाळ विसर्ग वाहतो
प्रतिबंधक उपाय-
गोठ्यातील गोचीड निर्मूलन:
1. जनावरांचा नियमित खरारा करावा.
2. पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने जनावरांचे गोचीड निर्मूलन करावे.
3. वर्षातून दोनदा गोठ्यातील भेगा फ्लेमगनच्या साह्याने जाळून घ्याव्यात.
संदर्भ – अग्रोवन