AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
लागवड कलिंगड आणि खरबूजाची
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
लागवड कलिंगड आणि खरबूजाची
जमीन व हवामान : ही पिके सर्व प्रकारच्या जमिनीत येते. वालुकामय, पोयट्याची, मध्यम ते काळी, सेंद्रिययुक्त जमीन कलिंगड लागवडीसाठी उत्तम राहते. आठपेक्षा जास्त सामू, चुनखडीयुक्त, खारवट, चोपण जमीन लागवडीस अयोग्य आहे. कारण अशा जमिनीत अति प्रमाणात असणार्‍या कॅल्शियम सल्फेट क्लोराईड, कार्बोनेट व बायकार्बोनेटसारख्या विद्राव्य क्षारांमुळे खरबूज फळांवर डाग पडण्याची शक्यता असते. ५.५ ते ७.५ सामू असणारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन लागवडीस योग्य राहते. आम्ल धर्मीय जमिनीतही ही पीके तग धरू शकतात. या पिकांसाठी उष्ण व कोरडे हवामान आणि भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. विलींची वाढ होण्याकरिता २४ अंश सेल्सिअस ते २७ अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त असते. तापमान कमी अधिक वाढ झाल्यास म्हणजेच १८ अंश सेल्सिअस च्या खाली व ३२ अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास वेलींच्या वाढीवर व फळधारणेवर विपरीत परिणाम होतो. २१ अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान असल्यास बियांची उगवण होत नाही. वाढीच्या कालावधीत हवेमध्ये दमटपणा व धुके असल्यास वेलींची वाढ व्यवस्थित होत नाही व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. अलीकडे कडक उन्हाळ्याचा आणि भर पावसाळ्याचा काळ सोडला तर या पिकांची वर्षभर लागवड केली जाते.
सुधारित जाती : कलिंगड : शुगरबेबी, अर्का माणिक, असाही यामाटो, मधु, मिलन, अमृत, सुपर ड्रॅगन, ऑगस्टा, शुगर किंग,बादशाह इत्यादी सुधारित जातींप्रमाणेच काही खाजगी कंपनीच्याही भरपूर जाती मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्या जातींचा अनुभव लक्षात घेऊन लागवडीसाठी निवड जरूर करावी. सध्या सिंजेन्टा कंपनीची “शुगर क्वीन” ही जात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये अतिशय प्रसिध्द झालेली आहे. खरबूज : पुसा शरबती, अर्का जीत, अर्का राजहंस, हरा मधु, दुर्गापूर मधु , पुसा मधूरस, पुसा असबाती, अर्का राजहंस, अर्का जेस्ट, पंजाब सुनहरी, पंजाब हायब्रीड, लेनो सफेद, अन्ना मलई, हरीभरी, इ. विद्यापीठांनी शिफारस केलेल्या तर बॉबी, एन.एस.९१०, दीप्ती, सोना, केशर या खाजगी कंपन्यांच्या जातींचाही दर्जा व उत्पादन चांगले असल्याने लागवडीस शेतकर्‍यांच्या पसंतीस उतरलेल्या आहेत. सध्या न्वो युअर सीड कंपनीची “कुंदन” ही जात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये अतिशय प्रसिध्द झालेली आहे. बियाणे : शेतकरी कलिंगडाचे साधारणत:एक किलो बी प्रती एकरी वापरतात. संकरित जातींचे एकरी ३०० ते ३५० ग्रॅम देखील बी पुरेसे होते. खरबुजाच्या सुधारित जातीचे एकरी साधारण अर्धा किलो बी पुरेसे होते, तर संकरीत जातीचे बी एकरी १०० ते १५० ग्रॅम लागते. थंडीमध्ये बियांची उगवण कमी होते. वाढ लवकर होत नाही. यासाठी २५० ग्रॅम बियासाठी २५० मिली गरम पाण्यात अगोदर बी भिजवून नंतर सुकवून प्रती किलो बियाणास ३ ग्रॅम थायरम चोळल्यास बियांची उगवण २ ते ३ दिवस लवकर व निरोगी होते. मर होत नाही. सर्वसाधारणपणे ६ ते ८ दिवसांनी बियांची उगवण होते. लागवडी अगोदर बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. लागवड : या पिकांची लागवड बाजारपेठेची मागणी पाहून १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी दरम्यान करावी. फळे ऐन उन्हाळ्यात एप्रिल-मे मध्ये बाजारात विक्रीसाठी तयार होतात. त्यांना मागणी अधिक राहते. त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात. लागवड दोन पद्धतीने केली जाते. एक म्हणजे रोपे तयार करून आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये बियांची थेट गादीवाफ्यामध्ये टोकण केली जाते. बी टोकन पद्धतीमध्ये उगवणक्षमता कमी राहाते, त्यामुळे न उगवलेल्या ठिकाणी पुन्हा बी टोकण करावे लागते. यामुळे रोपांची वाढ मागे-पुढे होते, पुढील पीक व्यवस्थापनात त्याचा अडथळा येतो, तसेच मजुरीही वाढते. लागवडीच्या नियोजनानुसार कोकोपीट ट्रेमध्ये रोपे तयार करावीत. रोपे तयार होण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी लागतो. लागवडीपूर्वी जमिनीची खोल उभी आडवी नांगरणी करून प्रति एकरी चांगले कुजलेले ७ ते ८ टन शेणखत किंवा कोंबडीखत जमिनीत मिसळून द्यावे. गादीवाफा तयार करत असताना एकरी १० किलो युरिया, १० किलो सुपर फोस्फेट, १० किलो पोटाश तसेच २००किलो निंबोळी पेंड, ४ किलो झिंक सल्फेट, ४ किलो मॅग्नेशिअम सल्फेट, ४ किलो फेरस सल्फेट लागवडीपूर्वी गादीवाफ्यामध्ये मिसळून द्यावीत. खतमात्रा मिसळल्यानंतर गादीवाफा एकसमान करून मधोमध ठिबकची लॅटरल टाकून ठिबक संचातून पाणी सोडून लॅटरल तपासणी करून घ्यावी. त्यानंतर गादीवाफ्यावर चार फूट रुंदीचा २५ ते ३० मायक्रॉन जाडीचा मल्चिंग पेपर अंथरावा. हा कागद वाऱ्याने उडू नये म्हणून गादीवाफ्याच्या कडेने त्याला मातीची भर द्यावी. मल्चिंग पेपर लावताना पेपर गादीवाफ्याला बेडला समांतर राहील, तो ढिला पडणार नाही याची काळजी घ्यावी कारण मल्चिंग पेपर ढिला राहिला तर वाऱ्यामुळे फाटण्याची शक्यता असते. मल्चिंग पेपर चा विचार करता एक एकरामागे साधारण ४ ते ५ किलो मल्चिंग पेपर लागू शकतो. रोप लागवडीच्या आदल्या दिवशी लॅटरलच्या दोन्ही बाजूंस १५ सें.मी. अंतरावर रोपे लावता येतील अशा अंतरावर छिद्रे पाडून घ्यावीत. एका ओळीतील दोन छिद्रांमधील अंतर दोन फूट ठेवावे. छिद्रे पाडून झाल्यावर ठिबक सिंचन संचाच्या मदतीने गादीवाफा ओला करून घ्यावा. यानंतर छिद्रे पाडलेल्या ठिकाणी रोपांची लागवड करून घ्यावी. अशा प्रकारे लागवड केल्यास एकरामागे साधारण ६००० रोपांची लागवड करता येऊ शकते. अन्नद्रव्ये व्यवस्थापन : • लागवडीनंतर १० - १५ दिवसांत : १९:१९:१९ - २.५-३ ग्रॅम, सुक्ष्म अन्नद्रव्ये - २.५-३ ग्रॅम प्रती लिटर पाणी • वरिल फवारणीनंतर ३० दिवसांनी : २० टक्के बोरॉन - १ ग्रॅम, सुक्ष्म अन्नद्रव्ये २.५-३ ग्रॅम प्रती लिटर पाणी • फुलोरा अवस्थेत : ००:५२:३४ - ४-५ ग्रॅम, मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २) - २.५-३ ग्रॅम प्रती लिटर पाणी • फळ धारणा : ००:५२:३४ - ४-५ ग्रॅम, बोरॉन - १ ग्रॅम प्रती लिटर पाणी • फळ पोसत असतांना : १३:००:४५ - ४-५ ग्रॅम, कॅल्शियम नायट्रेट - २-२.५ ग्रॅम प्रती लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी. या पिकांना माती परीक्षण अहवालानुसारच रासायनिक खते, सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा द्यावी. एकरी २० किलो नत्र,१२ किलो पालाश, १२ किलो स्फुरद या प्रमाणात रासायनिक खते द्यावीत. १० दिवसांनी एकरी २ किलो प्रत्येकी पीएसबी, अँझोटोबॅक्टर, ट्रायकोडर्मा द्यावे. खतांची मात्रा सुरवातीला कमी असावी. खते देताना संपूर्ण शेणखत, स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा व नत्राची एक तृतीयांश मात्रा लागवडीच्या वेळी द्यावी. उरलेले नत्र दोन समान हप्त्यांत लागवडीनंतर एक आणि दोन महिन्यांनी द्यावे. पिकाला फुले लागल्यापासून ते फळे परिपक्व होईपर्यंत विद्राव्य मात्रा वाढवत न्यावी. खते देण्यापूर्वी एक तासभर ठिबक संच चालू ठेवावा. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खते शिफारशीनुसार द्यावीत. पाणी व्यवस्थापन : ही पिके पाण्याबाबत खूपच संवेदनशील आहेत. सुरवातीच्या काळामध्ये पिकाची पाण्याची गरज कमी असते. पुढे पीक वाढीनुसार पाण्याची गरजही वाढत जाते. फळ लागण्याच्या कालावधीनंतर पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. जमिनीत ६५ टक्के ओल कायम राहील अशा पद्धतीने जमिनीच्या मगदुरानुसार व पीकवाढीचे टप्पे लक्षात घेऊन ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी आणि विद्राव्य खताचे नियोजन करावे. पाणी प्रमाणापेक्षा जास्त दिले तर रोग पडण्याची शक्यता जास्त असते. तेव्हा पाणी टेक पद्धतीने द्यावे. भिज पाणी पद्धतीमुळे पाणी जादा झाल्यास मुळकुजव्या होण्याची शक्यता असते. प्लॅस्टिक आच्छादनामुळे फळांचा ओल्या जमिनीशी थेट संपर्क येत नाही, त्यामुळे फळांना इजा होत नाही. फळे एकाच जागी राहिल्यास ज्या बाजूने जमिनीशी संपर्क येतो, तेथे फळांना इजा पोचते. यासाठी फळे मोठी झाल्यानंतर तोडणीआधी किमान एकदा फिरवून घ्यावीत. तण नियंत्रण : वेळोवेळी खुरपणी करून तणांवर नियंत्रण ठेवावे. मल्चिंग केल्याने तण नियंत्रणाबरोबरच मातीचे तापमानही नियंत्रणात राहून त्याचा पिकाच्या वाढीला चांगला उपयोग होईल. पिक संरक्षण : नागअळी, फळमाशी, मावा, तांबडे भुंगे, इत्यादी किडींचा या पिकांवर प्रादुर्भाव होत असतो. तसेच मर, भुरी, खोडावरील डिंक्या आणि करपा हे रोग या पिकांवर पडत असतात. रोगांपासून संरक्षणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा कॅप्टन या बुरशीनाशकाची अथवा ट्रायकोडर्मा जैविक रोगनियंत्रकाची ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. पिकांचे वेळोवेळी निरिक्षण करून एकात्मिक कीड व रोग व्यावस्थापांतून या किड-रोगांवर नियंत्रण मिळवावे. विशेष काळजी : फळे लागल्यानंतर फळांचा पाण्याशी संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी. पाण्याशी फळांचा संपर्क आल्यास फळे सडतात. यासाठी फळे दोन सर्‍यांच्या उंचवट्यावर ठेवावी किंवा फळाखाली चगाळ (भात, बाजरी,गव्हाचा काड) ठेवावा. फळे एकाच जागी राहिल्यास ज्या बाजूने जमिनीशी संपर्क येतो, तेथे फळांना इजा पोचते. यासाठी फळे मोठी झाल्यानंतर तोडणीआधी किमान एकदा फिरवून घ्यावीत. प्लॅस्टिक आच्छादनामुळे फळांचा ओल्या जमिनीशी थेट संपर्क येत नाही, त्यामुळे फळांना इजा होत नाही. उन्हापासून फळांचे संरक्षण करण्यासाठी हळदीचा पालापाचोळा, उसाचे पाच गावात, इत्यादी वापरून शेतातील फळे झाकून ठेवावीत. त्यामुळे उन्हाचा चट्टा न पडत नाही. काढणी व उत्पादन : सर्वसाधारणपणे ४० दिवसांनी या पिकांना फूल लागण्यास सुरुवात होऊन ६० दिवसांनी गुंड्या लागणे सुरू होते. शक्यतो एका वेलीवर दोनच फळे ठेवावीत. साधारणपणे ९० ते १२० दिवसांमध्ये फळे काढणीस येतात व २० ते ३० दिवसात काढणी पूर्ण होते. फळ लागल्यापासून ते फळ विक्रीसाठी तोडेपर्यंत किमान ४० ते ४५ दिवस तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असणे आवश्‍यक आहे. कलिंगडाचे साधारण जातीनिहाय एकरी २० ते ४५ टन उत्पादन मिळू शकते. खरबुजाचे साधारणत:एकरी १० ते १५ टन उत्पादन मिळते. प्लास्टिक मल्चिंग चा वापर केल्यास उत्पन्न वाढते.काढणी सकाळी करावी. त्यामुळे फळांचा ताजेपणा व आकर्षकता टिकून राहते व ती चवीला चांगली रुचकर लागतात. डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर (सहाय्यक प्राध्यापक, डॉ.वि.वि.पा.फौं.चे कृषि महाविद्यालय, विळद घाट, अहमदनगर)
516
7