मिलिबगच्या जैविक नियंत्रणासाठी याचा करा वापर
जैविक शेतीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिलिबगच्या जैविक नियंत्रणासाठी याचा करा वापर
मिलिबग म्हणजे पिठ्या ढेकूण बहुपीक भक्षी प्रकारातील कीड आज सर्वत्र आढळून येत आहे. डाळींब, द्राक्ष, पेरु, अंजीर, चिकू या फ़ळ पिकांपासून तर ऊस, कापूससारख्या पिकांवरदेखील मिलिबग ही कीड मोठ्या प्रमाणात दिसून येते. या किडींवर रासायनिक कीडनाशकांपेक्षा ही जैविक घटकांद्वारे नियंत्रण लवकर शक्य होते. या सर्व जैविक घटकांमध्ये परभक्षी कीटकांचे महत्व जास्त आहे. यात क्रिप्टोलिमस मॉन्ट्राझायरी या ऑस्ट्रेलियन लेडी बर्ड बीटलच्या वापरामुळे दीर्घकाळ नियंत्रण मिळते. क्रिप्टोलिमस मिलिबगच्या विविध प्रजातींचे भक्षण करत असतो. यात प्रामुख्याने मॅकोनेलिकॉकस हिरसुटस, फ़ेरसिया विरगेटा, फ़ेनोकॉकस सोलेनोप्सिस इत्यादी प्रजातीवर क्रिप्टोलिमस उपजिवीका करतो. क्रिप्टोलिमसची प्रौढावस्था व अळी अवस्था अतिशय खादाड असून मिलिबग हेच खाद्य असल्यामुळे मिलिबगच्या सर्वच अवस्थांवर खाऊन जगते. अळी अवस्था प्रौढावस्थेपेक्षा जास्त खादाड असते त्यामुळे या अवस्थेकडून नियंत्रण जलद मिळते.
क्रिप्टोलिमस शेतात सोडताना घ्यावयाची काळजी:- क्रिप्टोलिमसची अळी अवस्था अतिशय नाजूक असते. प्रयोगशाळेतून आणलेल्या अळ्या ब्रशच्या साहाय्याने मिलिबग असलेल्या पिकाच्या भागांवर म्हणजेच शक्यतो ज्या ठिकाणी मिलिबगची वसाहत मोठ्या प्रमाणावर असेल जसे की, फ़ळे, खोड, फ़ांद्या यावर सोडून द्याव्यात. शक्यतो संध्याकाळच्या वेळेस हे काम करावे. फ़ळझाडांमध्ये प्रति झाड ५ ते १० क्रिप्टोलिमसच्या अळ्या किंवा प्रौढ भुंगेरे सोडावेत. इतर पिकांमध्ये ठिकठिकाणी क्रिप्टोलिमस भुंगेरे सोडावीत. क्रिप्टोलिमस सोडताना शेतात पुरेशी आर्द्रता असावी तसेच रासायनिक कीड नाशकांचा वापर झालेला नसावा प्रौढ भुंगेरे संध्याकाळच्या वेळेस बरनीचे झाकण उघडून सोडावेत. जसा मिलिबगचा प्रादुर्भाव वाढत जाईल, तसे क्रिप्टोलिमस शेतातील संख्या वाढत जाते. मिलिबगचा प्रादुर्भाव जास्त असताना वर्षातून दोनदा क्रिप्टोलिमसचा प्रसार करावा. कीटकनाशकांचा वापर नसल्यास पुन्हा पुन्हा क्रिप्टोलिमस शेतात सोडायची आवश्यकता येत नाही. संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
71
0
इतर लेख