सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
कापूस पिकातील बोंडे सड व त्याचे योग्य व्यवस्थापन!
कपाशी पिकामध्ये बोंडे सडण्याची समस्या बऱ्याच भागामध्ये दिसून येत आहे. त्यामध्ये बहुतेक बोंडे बाह्य भागावरून निरोगी दिसतात. तर काही बोंडांवर रस शोषणाऱ्या किडी व ढेकणांच्या प्रादुर्भावाची लक्षणे असतात. साधारणतः बोंडातील एक ते दोन कप्पे तर काही ठिकाणी संपूर्ण बोंड सडल्याचे आढळते. बोंड सडण्याचे प्रकार व कारणे: बोंड सडण्याचे प्रामुख्याने: दोन प्रकार आढळतात १) बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा संसर्ग :- या प्रकारात मुख्यतः काही रोगकारक बुरशी, कुजलेल्या अवशेषांवर जगणारे सूक्ष्मजीव तसेच काही प्रमाणात बोंडावरील जिवाणू करपा कारणीभूत असतो. साधारणतः बोंडे परिपक्व व उमलण्याच्या अवस्थेत असे प्रकार आढळून येतात. २) आंतरिक बोंड सडणे रोग :- ही समस्या प्रामुख्याने संधिसाधू व कमी प्राणवायू अवस्थेत तग धरणारे रोगकारक जिवाणू आणि काही प्रमाणात अंतर्वनस्पतीय रोगकारक बुरशी यांच्या संसर्गामुळे होतो. अशी बोंडे बाहेरून निरोगी दिसतात. मात्र, ती फोडली असता आतील रुई पिवळसर-गुलाबी ते लाल-तपकिरी रंगाची होऊन सडल्याचे दिसते. बोंडावर पाकळ्या चिकटून राहिल्याने बोंडाच्या बाह्यभागावर ओलसरपणा राहतो. अशा ठिकाणी जीवाणूजन्य व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. पोषक घटक - पावसाळ्यात होणारा संततधार व रिमझिम पाऊस, सतत ढगाळ हवामान, हवेतील अधिक आर्द्रता, कळ्यांवर व विकसित होणाऱ्या बोंडावरील रस शोषणारे ढेकूण यांचा प्रादुर्भाव अशा घटकांमुळे आंतरिक बोंड सडण रोगाची समस्या आढळते. बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाय योजना:  बोंडाना चिकटून राहिलेल्या सुकलेल्या पाकळ्या शक्यतो हाताने काढून टाकाव्यात. त्याठिकाणी ओलसरपणा राहून रोगकारक तसेच संधिसाधू जिवाणू व बुरशींची वाढ होणार नाही.  पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत विशेषतः रस शोषक किडी व ढेकणांच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवून वेळीच उपाययोजना कराव्यात.  बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा बुरशीचा संसर्ग रोखण्यासाठी पायराक्लोस्त्रोबीन (२०% डब्ल्यू.जी.) १ ग्रॅम किंवा मेटीराम (५५%) अधिक पायराक्लोस्ट्रॉबीन (५% डब्लू.जी.) (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल (२५% ई.सी.) १ मिली किंवा प्रोपीनेब (७०% डब्लू.पी.) २.५ ते ३ ग्रॅम. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी आणि आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
20
5
इतर लेख