सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळद व आले पिकातील कंदकुज रोगाचे नियंत्रण!
लक्षणे:- हळद किंवा आले पिकात पाणी साचून राहिल्यास कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. या पिकांमध्ये कंदकूज प्रामुख्याने बुरशी किंवा जिवाणूमुळे होतो. कंदकुज बुरशीजन्य आहे की जिवाणूजन्य आहे ते सर्वप्रथम ओळखावे. प्रथम पानांचे शेंडे वरून व कडांनी पिवळे पडून खालीपर्यंत वाळले जातात. खोडाचा जमिनीलगतचा भाग काळपट राखी पडतो. याच ठिकाणी माती बाजूस करून पाहिल्यास गड्डाही वरून काळा पडलेला व निस्तेज झालेला दिसतो. या भागावर दाब दिल्यास त्यातून कुजलेले, घाण वास येणारे पाणी बाहेर येते. अशा झाडाचे खोड थोडे जरी ओढले तरी चटकन हातात येते. हा रोग प्रामुख्याने सुत्रकृमी किंवा खुरपणी करताना/आंतरमशागत करताना कंदास ईजा झाल्यास त्यातून बुरशींचा गड्ड्यामध्ये शिरकाव होऊन कंदकुजण्यास सुरुवात होते. नियंत्रण:- • बुरशीजन्य कंदकूज प्रतिबंधासाठी जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्लस २ ते २.५ किलो प्रतिएकरी २५० ते ३०० किलो सेंद्रिय खतामध्ये मिसळून दीड महिन्याच्या अंतराने २ ते ३ वेळा वापरावे. • पाण्याचा योग्य निचरा ठेवावा. • कंदकूजीस सुरवात झाल्यानंतर किंवा रोगाची तीव्रता जास्त असल्यास, मेटॅलॅक्‍सिल (८%) + मॅंकोझेब (६४% डब्ल्यूपी) हे संयुक्त बुरशीनाशक २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी. • आळवणी करताना जमिनीस वाफसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास थोडासा पाण्याचा ताण द्यावा. • जिवाणूजन्य कंदकूज ओळखण्यासाठी रोगग्रस्त कंदाचा भाग धारदार ब्लेडने कापून स्वच्छ काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन त्याचे टोक त्यामध्ये बुडवावे. त्यामधून दुधासारखा स्राव पाण्यामध्ये आल्यास जिवाणूजन्य कंदकूज आहे हे ओळखावे. जीवाणूजन्य कंदकूज असल्यास स्ट्रेप्टोमायसिन २ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
131
92
संबंधित लेख