AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेती काही कालांतराने
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
शेती काही कालांतराने
भारतीय शेती दिवसेंदिवस कात टाकताना दिसते, नानाविध बदल आत्मसात करत असताना होत जाणारी प्रगती उल्लेखनीय बाब आहे. विशेष गोष्ट अशी कि या सर्वच बदल आणि प्रगतीचे जनक शेतकरी म्हणजेच तुम्ही आहात. राज्यकर्त्यांची धोरणे, जागतिकीकरणाचा रेटा, निसर्गाचा लहरीपणा इत्यादी आव्हानांना लिलया पेलणारा दुसरा तिसरा कुणीही नसून शेतकरी राजाच असू शकतो. मोबाईल व इंटरनेट च्या जमान्यात माहितीचे आदानप्रदान अतिशय फास्ट होते आणि तरुण पिढीचा शेतीत असणारा पुढाकार निश्चितच काही दिवसात शेतीला यशस्वीतेच्या शिखरावर नेल्या शिवाय राहणार नाही. शेतीमध्ये होत गेलेल्या सुधारणा नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची वृत्ती तरुणांकडे जास्त असल्यामुळे विकासाचा वेग अतिशय चांगला आहे. शासनाच्या अंकुशाखाली चालणारी विद्यापीठे विरुद्ध स्वतः शेतीत प्रयोग करणारी शेतकरी मंडळी यामधून झालेली निकोप स्पर्धा अतिशय चांगल्या गोष्टींची जनक आहे. अशाच प्रकारची भूमिका प्रायव्हेट कंपनी प्रतिनिधींनीही ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आसरा वाटू लागला आहे. वैयक्तिक शेती निविष्टांचा विक्री व्यवसाय वाढविण्यासोबतच शेतकरी ज्ञात करण्याची भूमिका फार उपयोगी झाली आहे.
पारंपारिक शेतीमध्ये महिनोन महिने चालणारी उन्हाळी जमीनीची मशागत आणि विशेष करून 4 बैलांची भर उन्हात चालणारी नांगरणी, त्यानंतर पावसाच्या आगमनावर आधारित पेरणी. पेरणी सुद्धा सरळ वाणांची, ना कुठली सुधारित जात ना कि संशोधीत वाण पारंपारिक घरगुती बियाणे संकरीतचा तर गंधही नव्हता. घरच्याच गोठ्यात तयार झालेले सेंद्रिय शेणखत वापरण्याचे ते दिवस. आणि आता एखादे पिक काढणी होऊन बाजारपेठेत पोहचण्याचा अवकाश कि मागे पुढील पिकासाठी शेत तयार. नागरणी नाही कि वखरणी नाही रोटावेटर मुळे रातोरात शेत तयार, रोपवाटीकांमधून कोकोपीट मध्ये वाढलेली कोमल अशी रोपे लागवडीसाठी सज्ज. जुन्या काळात पाट पद्धतीने पाणी देण्यासोबतच सरी वरची लागवड आणि आताच्या जमान्यात ठिबक संच त्यानंतर पॉलिथिन मल्चिंग च्या जोडीला अत्याधुनिक असे क्रॉप कव्हर. शेतकरी पिकांची अशी काही निगा राखतो जसे तान्ह्या बाळाचे संगोपन करताय. आणि का करू नये? जर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साथीने उत्पादन वाढीसाठी हे करणे गरजेचेच होऊन बसले आहे. विहिरी वरच्या थारोळ्यात तेव्हा मोटेचे पाणी यायचे नंतरच शिवार भिजायचे परंतु तंत्रज्ञान झपाट्याने बदलले आता मोट सोडाच पाण्याची मोटार चालू बंद परदेशातूनही होऊ लागली कारण मोटार ऑटो स्टार्टर आला आणि तोच विहिरीतील पाण्याची पातळी घरात बसून सांगूही लागला. प्रगत देशातील तंत्रज्ञान आत्मसात करत असताना ठिबक, विद्रव्ये खते यामुळे पाण्यातील बचतीसोबतच गुणवत्तापूर्ण शेती उत्पादन पदरात पडू लागले. दिवसागणिक बदल घडत गेले; येत्या काही दिवसांत यांत्रिकीकरण शेतीसाठी अझुनही वरदान ठरेल आणि निश्चितच तुम्ही आम्ही या बदलांन सोबतच क्रांती चे साक्षीदार असू. हीच क्रांती आहे उज्वल भारताचे भविष्य. बुध्दीमान आणि बलवान! जय किसान!
325
0