गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस उत्पादनाची पंचसूत्री
शेतकरी बंधुनो खरीप हंगामातील महाराष्ट्रात घेतले जाणारे सर्वाधिक लोकप्रिय कपाशीचे उत्पादन यावेळी जास्तीत जास्त निघण्यासाठी आपण काही बाबींचा जाणीवपूर्वक अभ्यास याठिकाणी करूयात. किड-रोग मुक्त आणि गुणवत्तापूर्ण कपास उत्पादनासाठी खालील महत्वाच्या पाच गोष्टींचा अंतर्भाव करूयात.
1. जमीन प्रकारानुसार वाण निवड- बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या शेकडो वाणांपैकी आपल्याला कोणते निवडावे असा एक सामान्य प्रश्न उत्पादकाला पडत असतो. मुख्यत्वे काळी कसदार, मध्यम ते भारी जमीन आणि हलकी किंवा मुरूम युक्त माती यापैकी कोणती माती आपल्याकडे जमिनीत आहे याचा सर्वप्रथम विचार करावा. भारी जमिनीत येणारे एखादे वाण हलक्या जमिनीतही येईल परंतु अपेक्षित उत्पादन घेणे शक्य होणार नाही याचा विचार करणे खुप गरजेचे आहे.
हलक्या जमिनीत- महिको 7351, अल्पागिरी टोटल, राशी निओ, कावेरी एटीएम यापैकी एक मध्यम जमिनीत- महिको 7383, कावेरी जादू, राशी-659, अंकुर-3028, अजित-155 यापैकी एक व भारी जमिनीत- महिको निक्की प्लस, अंकुर सुवर्णा यापैकी एक वाण निवडले तर निश्चित उत्पादन वाढेल.
2. योग्य अंतरावर लागवड- आपल्या जमिनीच्या क्षमतेनुसार आणि पाणी व्यवस्थापन यानुसार लागवड अंतर व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे. अंतर कमी ठेवल्यास झाडांची संख्या वाढेलही परंतु फुलोरा व त्यानंतर आंतरमशागत तसेच फवारणी घेणे कठीण होते. झाडाच्या फांद्या एकमेकांमध्ये अडकल्यास किड-रोग नियंत्रण कठीण होते सोबतच पातेगळीची समस्यासुद्धा भेडसावते. यासाठी बागायती कापूस बियाणे 4 फुट पेक्षा कमी अंतरावरील सरीत लावणे टाळावे. ठिबकद्वारे पाणी नियोजन असल्यास 5 ते 6 फुट अंतर सरीमध्ये असणे आवश्यक आहे.
3. अन्नद्रव्ये व्यवस्थापन- पारंपारिक शेती उत्पादनात खतांचा वापर शास्रशुद्ध न होता असंतुलित होताना दिसते. मुख्य बाब यापूर्वी खतांचा असणारा तुटवडा गेल्या काही दिवसांपासून कमी जाणवतो त्यामुळे संतुलित खत वापर होणे गरजेचे आहे. कपाशी लागवड करतेवेळी गावखत किंवा शेणखत पसरावे, पेरणी वेळी नत्र, स्पुरद आणि पालाश तिन्ही मिक्स खत वापरावे. पहिल्या निंदनी च्या वेवेळी नत्रयुक्त खताचा एक हात सोबत लाल्या प्रतिबंधक मॅग्नेशियम सल्फेट वापरावे. फुल-पाते गळ होऊ नये म्हणून तिसरा खतांचा डोस ज्यामध्ये नत्र, स्पुरद आणि पालाश सोबत सुक्ष्म अन्नद्रव्ये मिश्रण घ्यावे. जमिनीतील अन्नद्रव्ये जितकी महत्वाची तितकेच फवारणीद्वारे आवश्यकता नुसार अन्नद्रव्ये दिल्यास फायदा निश्चित होईल.
4. किड-रोग प्रतिबंधक नियंत्रण- कापूस उगवण झाल्यापासून टप्प्या-टप्प्याने विविध किडींचा प्रादुर्भाव होतो जसे कि सुरवातीला पांढरी माशी आणि तुडतुडे, फुलोऱ्यात थ्रीप्स व बोंड पक्वतेवेळी पुन्हा पांढरी माशी इत्यादी मग या पिक वाढीच्या अवस्थांमध्ये किड येण्यापूर्वीच फवारणी केल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान टळू शकेल. बोंड अळी येऊ नये यासाठी कामगंध सापळे एकरी 6 ते 8 लागवडी नंतर 30 दिवसांनी लावावे. सोबतच फुलोरा अवस्थेत अळीनाषक फवारणी दोनदा करावी.
5. पातेगळ व्यवस्थापन- सर्वात शेवटी परंतु महत्वाचे म्हणजे झाडावरील पाते गळून न देता बोंड धारणा होणे आवश्यक आहे. पाते गळ होण्यास कारणे अतिवृष्टी झाल्यास जमिनीत वाफसा न येणे, मुळीकडून अन्नद्रव्ये अपटेक न होणे, रस सोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त असणे, ढगाळ हवामान आणि पावसाचे पाणी पात्यामध्ये जाऊन पाते सडणे इत्यादी असू शकतात. यावर उपाय म्हणून एकात्मिक व्यवस्थापन होणे गरजेचे आहे जसे कि कपाशीची उंची जास्त वाढू न देणे, खतांची मात्रा देणे, फवारणीद्वारे बोरॉन व कॅल्शियम वापरणे. पिकाचे अन्नद्रव्ये संतुलित करण्यासाठी नॅपथॅलीक ऍसिड सारख्या संप्रेरकाची फवारणी घ्यावी.
वरील प्रमाणे आपण पंचसूत्रीचा अवलंब करून उत्पादन वाढू शकतो कापसाच्या आणि इतर पिकांच्या अधिक माहितीसाठी अॅग्रोस्टार च्या टोल फ्री नंबर 1800 3000 7345 वर मिस्ड कॉल करा.