आरोग्य सल्लाAgrostar
शेतकऱ्यांनो पहा उष्माघात कसा टाळायचा?
🌤️शरीराचे तापमान वर्षातील सर्व ऋतूंत ३७ अंशाच्या खाली राहावे, अशी निसर्गाची योजना असते. त्यामुळे उन्हाळ्यात आपल्याला घाम जास्त येतो आणि तो वाळताना शरीरातील उष्णता वापरली जाऊन शरीराचे तापमान वाढत नाही, या उलट थंडीत आपल्याला घाम कमी येतो.
🌤️जागतिक तापमानवाढीचा भाग म्हणून भारतातही तापमानात मोठी वाढ होऊन होरपळ होण्याची तसेच योग्य काळजी न घेतल्यास उष्माघाताने जास्त लोक दगावण्याची शक्यता आहे, हे टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी पहा.
🌤️उष्माघात म्हणजे उन्हाळ्यामुळे प्रमाणाबाहेर ताप येऊन आपल्या तब्येतीत तात्पुरता पण गंभीर बिघाड होणे. त्यावर वेळेवर योग्य उपचार केले नाहीत, तर मृत्यू येऊ शकतो. उष्माघातात खूप ताप येऊन शरीराचे तापमान १०४ अंश फॅरेनहाइटच्या पुढे जाते.
🌤️पाच वर्षांखालील मुले, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, खूप लट्ठ व्यक्ती, दारूच्या अमलाखाली असणारे, काही विशिष्ट औषधे घेणारे यांना उष्माघाताचा धोका जास्त असतो.
🌤️तसेच रस्त्यावर, शेतात काम करणारे श्रमिक, रस्त्यावर विक्रीसाठी फिरणारे फेरीवाले, उन्हात खूप वेळ वाहने चालवणारे रिक्षाचालक, गरम वातावरणात काम करावे लागणारे कामगार यांनीही विशेष काळजी घ्यावी. दमट हवेत काम करणाऱ्यांना त्या हवेमुळे उन्हाळ्यात नेहमीपेक्षा जास्त घाम न आल्याने अशांनाही उष्माघात होण्याची शक्यता जास्त असते.
🌤️उन्हाळ्यात तहान, थकवा घालविण्यासाठी मीठ पाणी, सावलीत, गार हवेत विश्रांती अशा गोष्टी पाळल्या नाहीत, शरीरातील तुलनेने सौम्य बिघाडाकडे, पूर्व सूचनेकडे दुर्लक्ष केले, तर खूप थकवा येणे, तोंडाला कोरड पडणे, पायांचे व पोटाचे स्नायू दुखणे, त्यात पेटके येणे असा त्रास होतो.
🌤️हा त्रास म्हणजे उष्माघाताची पूर्वसूचना होय. ती ओळखून सावलीत, शक्यतो गार जागेत विश्रांती घेणे, मीठ घालून भरपूर पाणी घेणे हे कटाक्षाने करायला हवे. अशी पुरेशी काळजी घेतली गेली नाही आणि पाणी किंवा मीठ कमी पडले तर शरीरातील बिघाड वाढून उष्म दमछाक असा त्रास होतो. यात खूप घाम येतो, प्रचंड थकवा येतो, चक्कर मळमळ, उलटी असा त्रास होतो. कधी कधी ताप येत नाही, उलट कातडी थंड लागते. कधी कधी भ्रमिष्टासारखी अवस्था होते.
🌤️संदर्भ:- Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.