गुरु ज्ञानAgrostar
हळद पिकाची काढणी करण्याची योग्य पद्धत!
🌱महाराष्ट्रामध्ये हळद पीक हे प्रमुख नगदी मसाला पीक म्ह्णून ओळखले जाते. वाणांनुसार हळदीची काढणी
8 ते 9 महिन्यांमध्ये होते. पिकाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पाने पिवळी पडायला सुरुवात होते. काढणी आधी 15 ते 30 दिवस पिकास पाणी देणे बंद करावे. पाणी देणे बंद करताना प्रथम थोडे थोडे कमी करून नंतर पूर्ण बंद करावे. त्यामुळे पानातील अन्नरस कंदामध्ये लवकर उतरण्यास मदत होते. याचा हळकुंडाला वजन, गोलाई आणि चकाकी येण्यास मदत होते. पिवळी किंवा सुकलेली पाने जमिनीच्या वर 1 इंच खोड ठेवून धारदार विळ्याच्या साह्याने कापून घ्यावीत. पाने बांधावर गोळा करून ठेवून शेत 4 ते 5 दिवस चांगले तापू द्यावे. त्यामुळे हळदीच्या कंदामध्ये असलेल्या पाण्याच्या अंशामुळे जमीन साधारणपणे भेगाळली जाते. त्यामुळे हळदीची काढणी सुलभ होते.
🌱हळदीची काढणी मजुरांच्या साहाय्याने किंवा ट्रॅक्टरचलित हळद काढणी यंत्राचा वापर करून करता येते.
काढलेले कंद 2 ते 3 दिवस सूर्यप्रकाशात चांगले तापू द्यावेत. त्यामुळे कंदास चिकटलेली माती पूर्णपणे
निघण्यास मदत होते. त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी कंदाची मोडणी करावी. त्यानंतर जेठे गड्डे, बगल गड्डे,
हळकुंडे, सोरा गड्डे आणि कुजलेली सडकी हळकुंडे या प्रमाणे प्रतवारी करावी.
🌱प्रतवारी
अ) जेठे गड्डे
मुख्य रोपाच्या खाली वाढणाऱ्या कंदास जेठे गड्डे (मातृकंद) म्हणतात. हे गड्डे प्रामुख्याने पुढील वर्षी
लागवडीसाठी वापरता येतात. त्यामुळे काढणीनंतर लगेच हे गड्डे सावलीमध्ये ठेवावेत.
ब) सोरा गड्डा
लागवडीसाठी वापरलेले कंद 50 ते 60 टक्के कुजून जातात. उरलेल्या 40 ते 50 टक्के कंदाना ‘सोरा गड्डे’
म्हणतात. हे काळपट रंगाचे मुळ्यांविरहित असतात. यांना हळकुंडापेक्षा दुप्पट भाव मिळतो.
क) बगल गड्डे
जेठे गड्ड्याला आलेला फुटव्यांच्या खाली बगल गड्डे तयार होतात, यांस अंगठा गड्डे असेही म्हणतात. 40
ग्रॅमपेक्षा जास्त वजन असणाऱ्या गड्ड्यांचा वापर बियाणे म्हणून करतात.
ड) हळकुंडे
बगल गड्ड्यांना आलेल्या कंदास हळकुंडे असे म्हणतात. प्रामुख्याने प्रक्रिया करून बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी
याचा वापर करतात. यातील काही हळकुंडांना उपहळकुंडे येतात. त्यास लेकुरवाळे हळकुंडे असे म्हणतात.
याचा वापर धार्मिक कार्यात मोठ्या प्रमाणावर केला जातो.
🌱संदर्भ : Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.