agrostar logo
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सव्वा दोन हजार कोटी रब्बीसाठी कर्जवाटप!
कृषी वार्ताअॅग्रोवन
सव्वा दोन हजार कोटी रब्बीसाठी कर्जवाटप!
➡️ रब्बी हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना १६ हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज वाटण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आत्तापर्यंत २ हजार ३२४ कोटी रुपयांपेक्षा जास्त वाटप झाले आहे, अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. ➡️एक ऑक्टोबरपासून राज्यात रब्बीच्या कर्जवाटापाला सुरूवात झाली. ‘‘पहिल्या महिन्यात साधारणतः ८-१० टक्के कर्जवाटप होते. मात्र, यंदा १३ टक्के वाटप ३० दिवसांत झाले आहे. डिसेंबरमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात उचल होईल. राज्यात चांगले जलसाठे व उसाचे क्षेत्र वाढत असल्याने कर्जउचल चांगली राहील. कर्जमाफी मिळालेले शेतकरी लॉकडाउनची समस्या दूर झाल्याने शेतीमध्ये पैसा गुंतविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे यंदा ३१ मार्चपर्यंत रब्बीचे कर्जवाटप चालू राहील,’’ अशी माहिती बॅंकिंग क्षेत्रातून देण्यात आली. ➡️दरम्यान, कोविड १९ ची स्थिती आणि लॉकडाउनमुळे यंदा खरिपाचे कर्जवाटप थेट ऑक्टोबरमध्ये काही बॅंका करीत असल्याचे चित्र दिसले. ४५ लाख शेतकऱ्यांना खरिपात ४५ हजार ७८५ कोटी रुपये वाटण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, लॉकडाउनमुळे खरिपाची कर्जउचल ३४ हजार ६६९ कोटी रुपयांपर्यंत (७६ टक्के) झाली आहे, असे सहकार विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. ➡️रब्बी पीक कर्जवाटाच्या पहिल्या टप्प्यात बॅंक ऑफ महाराष्ट्र आघाडीवर आहे. या बॅंकेने २२ टक्के वाटप एका महिन्यात केले. स्टेट बॅंकेने १९ टक्के तर सेंट्रल बॅंकेने १४ टक्के वाटप केले आहे. राष्ट्रीयकृत बॅंका यंदा ८ हजार ६६८ कोटी रुपये रब्बी कर्ज देणार आहेत. त्यापैकी १६ टक्के वाटप पहिल्या ३० दिवसांत झाले आहे. ➡️जिल्हा सहकारी बॅंकांनी ७५ हजार ५७५ शेतकऱ्यांना एकाच महिन्यात ४२८ कोटी रुपये वाटले आहेत. सहकारी बॅंकांनी यंदा पाच हजार कोटी रुपयांचे रब्बी कर्ज वाटणे अपेक्षित आहे. त्यापैकी ९ टक्क्यांच्या आसपास वाटप झाले आहे. ‘‘रब्बीत जिल्हा बॅंका यंदा चांगले वाटप करतील. शेतकरी वर्गाचे कर्ज उचलीचे प्रमाण डिसेंबर, जानेवारीमध्ये वाढेल,’’ असे विदर्भातील एका जिल्हा बॅंकेच्या कार्यकारी संचालकाने स्पष्ट केले. असे आहे रब्बीचे पीक कर्जवाटप नियोजन 👉१६ हजार ६७३ कोटी रुपये वाटण्याचे उद्दिष्ट. 👉ऑक्टोबरअखेरपर्यंत दोन हजार ३२४ कोटी रुपयांचे वाटप पूर्ण. 👉दोन लाख ३४ हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत कर्ज उचलले. 👉बीड, औरंगाबाद, अमरावती, अकोला, बुलडाणा, जळगाव, जालना, नांदेड, रायगड, वर्धा, वाशीम या जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २५ टक्क्यांपेक्षा जास्त वाटप. 👉भंडारा, धुळे, चंद्रपूर, कोल्हापूर, पालघर, परभणी, सांगली, सातारा, सोलापूर, ठाणे या जिल्ह्याचे कर्जवाटप ऑक्टोबरमध्ये सहा टक्क्यांपेक्षाही कमी. रब्बी पीक कर्जवाटप वाढीसाठी पोषक मुद्दे 👉लांबलेल्या मॉन्सूनमुळे तयार झालेले जलसाठे. 👉ऊस, गहू, हरभरा क्षेत्रात होत असलेली मोठी वाढ. 👉कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी नवे कर्ज घेणार. 👉थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी शासनाने दिलेली हमी. 👉कर्जवाटप होण्यासाठी शासनाने बॅंकांसोबत केलेले करार.
90
1
इतर लेख