गुरु ज्ञानAgrostar
वांगी पिकातील समस्या आणि उपाययोजना!
🍆वांगी पिकाचे उत्पादन संपूर्ण महाराष्ट्रात वर्षभर घेतले जाते आणि जास्त काळासाठी त्याच पिकापासून उत्पादन काढले जाते. जास्त काळासाठी एकाच जमीनीत एकच पीक राहिल्याने यामध्ये सूत्रकृमी, मर रोग, खोड अळी आणि शेंडे अळीचा मोठ्या प्रमाणत प्रादुर्भाव होतो. पावसाळ्यात तर अतिरिक्त पाण्यामुळे मर रोग आणि शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणणे अवघड जाते. त्यामुळे या सगळ्या समस्यांवर सुरुवातीपासूनच म्हणजेच प्रतिबंधक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
🍆पहिली समस्या म्हणजे जिवाणूजन्य आणि बुरशीजन्य मर यामध्ये संपूर्ण झाडाची पाने पिवळी पडून करपणे, झाडाची वाढ खुंटणे, झाडाची मुळे कुजणे अशी लक्षणे दिसून येतात. अळीचा प्रादुर्भाव असेल तर खोड किंवा शेंडा पोखरल्यामुळे त्यापुढील भाग अचानक सुकून जातो तसेच फळांना कीड लागलेली दिसून येते. सूत्रकृमींचा प्रादुर्भाव असेल तर झाडाच्या मुळांवर गाठी दिसून येतात, तयार झालेल्या गाठींमुळे झाडाच्या मुळांमधून अन्नद्रव्ये आणि पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही, यामुळे झाडाची पाने हळूहळू पिवळी पडून वळायला लागतात. या सगळ्या समस्यांमुळे वांगी पिकाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होतो.
🍆यासाठी वांगी पिकाच्या लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून जमिन चांगली उन्हात तापवून द्यावी. जेणेकरून जमीनीतील कीड, रोग आणि सूत्रकृमी नियंत्रित होण्यास मदत होईल. सुरुवातीला बेसल खतांची मात्रा देताना त्यासोबत 200 किलो निंबोळी पेंड, कार्बेन्डाझिम बुरशीनाशक 500 ग्रॅम आणि 15 किलो कार्बोफ्युरॉन कीटकनाशक प्रति एकर जमिनीतून द्यावे
🍆पिकात वेळीच तण नियंत्रित करावे तसेच पावसाळ्यात जमिनीत जास्त पाणी साचून राहत असेल तर पाण्याचा निचरा करून जमिनीत सल्फर किंवा अमोनियम सल्फेट अश्या खतांची मात्रा जमिनीत द्यावी जेणेकरून जमिनीत वापसा टिकून राहील आणि मुळीजवळ हवा खेळती राहील.
🍆पीक वाढीच्या अवस्थेत जमिनीतील बुरशी प्रतिबंध करण्यासाठी ट्रायकोडरमा व्हिरीडी 2 किलो, सुडोमोनास फ्लुरॉसेन्स 2 किलो आणि सूत्रकृमींसाठी पॅसिलोमायसिस लिलासीनास हे जैविक घटक 2 ते 4 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून जमिनीतून दयावे व त्वरित पाणी द्यावे. स्लरी तयार करून देखील सोडता येईल.
🍆अळी नियंत्रणासाठी फुलोरा अवस्थेत लाईट ट्रॅप किंवा कामगंध सापळे यांचा वापर करावा. तसेच जैविक फवारणीसाठी बेव्हिरिया बॅसियाना किंवा मेटारायझीम ऍनिसोप्लीया प्रत्येकी 2 ते 4 किलो 150 ते 200 लिटर पाण्यात मिसळून सकाळच्या अथवा सायंकाळच्या वेळी उभ्या पिकात फवारणी करावी.
🍆रासायनिक घटकांची फवारणी करायची असल्यास पिकात प्रादुर्भाव ग्रस्त झाडाचे शेंडे व फळे काढून नष्ट करावे. त्यांनतर फवारणी साठी इमामेक्टिन बेन्झोएट 5 % एसजी 80 ग्राम प्रति एकर किंवा क्लोरँट्रनिलीप्रोल 18.5 % एससी 80 मिली प्रति एकर यांसारख्या घटकांची फवारणी करावी. एकदा फवारलेलं कीटकनाशक लागोपाठ फवारण्यासाठी वापरू नये अन्यथा किडीमध्ये त्या रसायनाविरुद्ध सहनशक्ती निर्माण होऊन कीड नियंत्रित करणे कठीण होते.
🍆वरील पद्धतीने मर, कीड व सूत्रकृमी वेळीच नियंत्रित केली तर नंतर जास्त प्रादुर्भाव होणार नाही सोबतच खर्चही कमी होऊन उत्पादन वाढीस नक्कीच मदत होईल.