हवामान अपडेटअॅग्रोवन
राज्यातील 'या' भागांमध्ये पावसाची शक्यता!
➡️पावसाला पोषक हवामान असल्याने आज २९ डिसेंबरला विदर्भ, मराठवाड्यात विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. राज्याच्या किमान तापमानातील वाढ दोन दिवस कायम राहणार असून, त्यानंतर थंडी पुन्हा वाढण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. सोमवारी अकोला, नागपूर, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह पावसाने हजेरी लावली.
➡️राज्याच्या किमान तापमानात काल बऱ्याच भागांमध्ये दोन ते पाच अंश सेल्सिअसने वाढ झाल्याचे हवामाशास्त्र विभागाने (IMD) म्हटले आहे. तर वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे २९ आणि ३० डिसेंबरला विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करून दिली. तसेच मध्य भारतात दोन दिवसांनी काही ठिकाणी किमान तापमान दोन ते चार अंश सेल्सिअसने घसरण्याची शक्यताही वर्तवण्यात आली.
➡️पश्चिमी चक्रावातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये पाऊस पडत असून, राजस्थान परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून तेलंगणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. परिणामी, महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान झाले आहे. आज दुपारनंतर अकोल्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.
➡️राज्यात बहुतांश भागात गारठा कमी झाला असून, किमान तापमानातील वाढ दोन दिवस कायम राहणार आहे. मंगळवारी निफाड येथे नीचांकी ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच जेऊर येथे सर्वाधिक ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. दोन दिवसांनंतर राज्याच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने कायम ठेवली आहे.