पशुपालनAgrostar
पावसाळ्यात घ्या जनावरांच्या खुरांची काळजी !
🐄गोठ्यातील अस्वच्छता, दलदल आणि खडबडीत पृष्ठभाग खुरांच्या आजारास कारणीभूत असतात.वातावरणात ऋतुमानानुसार होणारे बदल लक्षात घेऊन, व्यवस्थापनात योग्य बदल न केल्यास दूध उत्पादनात फरक दिसून येतो. काही वेळेस जनावरांची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती खुरांच्या आजारास कारणीभूत असते. पावसाळ्यात खरिपातील शेतीकामांची लगबग देखील सुरु झाल्याने, बैल शेतीकामांसाठी निरोपयोगी ठरतात.
🐄बंदिस्त गोठ्याच्या तुलनेत मुक्तसंचार गोठ्यात जनावरांची खुरे नरम पडण्याचे प्रमाण जास्त असते. जनावरे शेणात आणि मूत्रात जास्त वेळ उभी राहिल्यास खुरे नरम पडतात. नरम पडलेली खुरे आजारास कारणीभूत ठरतात. नरम खुरांमध्ये व्रण तयार होतात. खुरांमध्ये गळू यायला लागतो. पुढे जाऊन खुरांच्या आतील भागातील लॅमिना या नाजूक भागाचा दाह होतो. खुरांचा दाह झाल्याने जनावरांना अचानक उठायला व बसायला त्रास होतो. खुरांचा दाह होत असल्याने पाय जमिनीवर टेकवत नाहीत. जनावरांना ताप येतो. श्वासाची गती वाढते. खुरांचा होणारा दाह पशुपालकांच्या वेळीच लक्षात न आल्यास खुरांना संसर्ग सुरु होतो.
🐄नरम पडलेल्या खुरांना लवकर भेगा पडतात. भेगांमध्ये जीवाणू संसर्ग होऊन खुरांचा दाह सुरु होतो. खुरांना संसर्ग झाल्याने, त्यातून सडल्यासारखा वास यायला लागतो. सुरुवातीला खुरांना तडा जाऊन जखमेतून ‘पू’ यायला लागतो. वेळेत उपचार न झाल्यास संसर्ग संध्यापर्यंत पोहोचतो.
🐄जनावरांची खुरे वर्षातून एकदा, पावसाळ्याआधी योग्य प्रकारे तपासून घ्यावीत. खुरांची कमी जास्त वाढ झाल्याने, जनावरांना त्यांचे वजन सर्व पायांवर संतुलितपणे पेलणे अवघड जाते. जनावरांवर शारीरिक ताण आल्याने, खुरांच्या आजारास लवकर बळी पडतात. बंदिस्त गोठा असल्यास जनावरांना स्वच्छ आणि कोरड्या जागी बांधावे. जनावर लंगडत असल्यास त्याच्याकडे दुर्लक्ष न करता पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.
🐄संदर्भ:- Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.