पशुपालनअॅग्रोवन
पशू सल्ला
थंड वातावरणामुळे जनावरांच्या नाक व डोळ्यांतून पाणी येणे, भूक कमी होणे, थरथर कापणे इ. लक्षणे दिसतात. ही लक्षणे टाळण्यासाठी जनावरांना संध्याकाळ होताच गोठ्यामध्ये बांधावे, त्यांना थंड वारे लागणार नाही याची काळजी घ्यावी. • जनावरांना गोठ्यातच कोरडा चारा उपलब्ध करून द्यावा. • जास्त थंडी असल्यास गोठ्यामध्येच शेकोटी पेटवून गोठा उबदार करावा, मात्र धूर व्यवस्थित बाहेर जाईल याची दक्षता घ्यावी. • थंड वातावरणात जनावरांना शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. ऊर्जेच्या कमतरतेमुळे जनावरांचे शरीर थंडीने थरथरताना दिसते. अशा वेळेस जर शरीरावरील केस ओले असतील, तर ऊर्जेची गरज अजून वाढते. • कमी होत जाणाऱ्या तापमानानुसार खाद्यात ऊर्जेचा स्त्रोत वाढविला, तरच दुभत्या गाई-म्हशींना थंडीपासून संरक्षण मिळू शकते. अशा वातावरणात जनावरांचे चारा खाण्याचे प्रमाण सुमारे १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढते, हे वाढलेले प्रमाण जनावरे शरीर स्वास्थासाठी लागणारी अतिरिक्त ऊर्जा मिळविण्यासाठी वापरतात.
• कोठीपोट (रुमेन) पूर्ण भरलेली जनावरे जास्त ऊर्जा उत्पन्न करून थंडीपासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतात. • थंड वातावरणात असणारी ऊर्जेची कमतरता लगेच भरून येत नाही, त्यामुळे खाद्यातील कुठलेही बदल हळूवार करावेत. • ऊर्जायुक्त खाद्य घटक जनावरांना दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी द्यावे जेणेकरून पचनातून निर्माण होणारी ऊर्जा रात्रीच्या वेळेस कामी येऊ शकेल. त्यामुळे तापमान कमी होण्याआधी आंबवण किंवा पशुखाद्याव्यतिरिक्त ऊर्जायुक्त घटक जसे मका एक किलो, बायपास फॅट १०० ग्रॅम इ. पशुखाद्यासोबत द्यावे. • योग्य निवारा, गाभण गायी-म्हशींची योग्य व्यवस्था, आरामदायी व उबदार बसण्याची सुविधा, तसेच शक्य तेवढे कोरडे वातावरण या काळात ठेवावे. • जनावरांना शरीर स्वास्थ्य व उत्पादनसाठी ऊर्जेची आवश्यकता असते. जर शरीर स्वास्थ्यासाठी लागणारी ऊर्जा कमी पडली, तर उत्पादनासाठीची ऊर्जा वापरली जाते. त्यामुळे दूध उत्पादनात किंवा फॅट व एसएनएफमध्ये घट दिसून येते. • तापमान कमी झाल्यामुळे जास्त ऊर्जा वापरली जाऊन वजन, प्रकृती अंक (बॉडी स्कोअर) खालावतो. • थंडीच्या ताणामुळे जनावराच्या शरीराच्या प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे इ. च्या गरजा बदलत नाहीत. एका अभ्यासानुसार घटत जाणाऱ्या १ अंश फॅरनहाइट तापमानाप्रमाणे १ टक्का जास्त ऊर्जेची पूर्तता पशुआहारातून केली पाहिजे. ही ऊर्जेची गरज साधारणतः १० ते २५ टक्के इतकी जास्त असते. • जनावरांचे वेळेवर जंत निर्मूलन करावे, त्यांना ताजे व स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे • वासरांची विशेष काळजी घ्यावी, गोठयामध्ये स्वच्छता करावी. जंतुनाशकाने गोठयाची स्वच्छता करावी जेणेकरून जनावरे आजारी पडणार नाहीत. डॉ. पराग घोगळे, _x000D_ पशुआहारतज्ज्ञ _x000D_ ९८९२०९९९६९
408
0
इतर लेख