AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
द्राक्षावरील पिठ्या ढेकूण (मिलीबग) किडीचे एकात्मिक व्यवस्थापन!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
द्राक्षावरील पिठ्या ढेकूण (मिलीबग) किडीचे एकात्मिक व्यवस्थापन!
पिठ्या ढेकूण रसशोषक किड द्राक्षबागेस सर्वाधिक नुकसान करताना आढळून येते. या किडीच्या वाढीसाठी उच्च तापमान व तुलनेने कमी सापेक्ष आर्द्रता पोषक असते. बाल्यावस्था व प्रौढ मादी या दोन्ही अवस्था द्राक्षवेलीच्या नवीन फुटलेल्या पालवीवर विशेषत: फळछाटणीनंतर रस शोषून घेतात. त्यामुळे पाने पालवी आखडली जातात. वेटोळा आकार निर्माण होऊन फळांची वाढ खुंटते. मण्यांमध्ये पाणी भरण्याच्या स्थितीमध्ये ही कीड खोडापासून ओलांडे फांद्या व द्राक्षांच्या मण्यांवरती स्थलांतरित होऊन त्यावर भरपूर प्रमाणात चिकट द्रव्य तयार करतात. त्यामुळे द्राक्षाचे घड चिकट बनतात. पिठ्या ढेकूण या किडीच्याभोवती पांढरे मेणाचे आवरण असते. त्यामुळे लांबून बघितल्यास ते कापसाच्या लहान लहान गोळ्यासारखे दिसतात. नंतर त्यावर काळसर बुरशीची वाढ होते.  जीवनक्रम:- पिठ्या ढेूकण किडीच्या अंडी, बाल्यावस्था व प्रौढ या तीन जीवनावस्था आढळून येतात. त्यापैकी बाल्यावस्था व प्रौढ मादी कीटक हे द्राक्षबागेत नुकसान करतात. प्रौढ मादी ही खोडावरील सैल सालीखाली कापसासारख्या अंडी कोषामध्ये 350 ते 500 अंडी घालते. अंडी ही गुलाबी ते नारंगी असून त्यांच्या उबवण्यासाठी सुमारे 5 दिवसांचा कालावधी लागतो. बाल्यावस्थेत मादी किटकास सुमारे 21 दिवसांचा कालावधी लागतो. या किडीच्या एका जीवनक्रमास सुमारे 30 दिवसांचा कालावधी लागतो.  एकात्मिक नियंत्रण:- 1) छाटणी झाल्यावर काड्या व पालापाचोळा तसेच मुख्य बुंध्यावरील सैल साली जाळून नष्ट कराव्यात. 2) द्राक्षबागेतील व सर्व आजूबाजूचे गवत आणि मुंग्यांची वसाहत नष्ट करावी. 3) पावसाळ्यात बिव्हेरिया बॅसियाना अथवा व्हर्टिसिलियम लेकॅनी (2×108 लर्षी प्रतिमिली अथवा प्रतिग्रॅम) 5 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. 4) मिलीबगचा प्रादुर्भाव बघून बुप्रोफेझीन 25% एससी 1.25 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे हे कीडनाशके प्राथमिक अवस्थेत फवारावे अथवा छाटणी नंतर या द्रावणाने खोड-ओलांडे धुवून घ्यावेत किंवा क्लोथीआणिडीन 50% डब्लू डी जी २०० ग्रॅम प्रति एकर 500 लिटर पाण्यात एकत्र मिसळून प्रती वेल 500 मिली द्रावण आळवणीद्वारे ड्रॉपर खाली टाकावे. सूचना :- बुप्रोफेझीन 25 एससी याचा काढणीपूर्वी कालावधी 40 दिवस व क्लोथीआणिडीन 50% डब्लू डी जी याचा काढणीपूर्वी कालावधी 60 दिवस आहे.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
19
8