सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
डाळिंब फळांतील रस शोषणारा पतंग आणि उपाय!
डाळिंब फळांवर रस शोषणाऱ्या पतंगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. हा निशाचर पतंग असून निसर्गतःच विशिष्ट प्रकारच्या तोंडाची रचना असल्याने हे पतंग रात्रीचे वेळी पुर्ण वाढ झालेली किंवा पक्व/पिकलेल्या फळांना आपल्या सोंडेने सुक्ष्म छिद्र पाडून आतील रस शोषतात. या किडीचा पतंग आकर्षक असून त्यांच्या मोठ्या आकारावरून आणि रंगावरून ते सहजपणे ओळखू येतात. पतंगाच्या पंखांची मागील जोडी पिवळ्या रंगांची असते आणि त्यावर विविध आकाराचे ठिपके असतात.  नुकसानीचा प्रकार: • या किडीचे पतंग रात्रीच्या वेळी फळांवर हल्ला करतात. म्हणून सर्वसाधारणपणे रात्री ८ ते ११ च्या आणि पहाटे ५ ते ६ दरम्यान या पतंगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. पतंग बागेत आल्यानंतर पक्व फळ शोधून त्यावर बसून ते फळांना आपल्या सोंडेने सूक्ष्म छिद्र पाडून त्यात सोंड खुपसून आतील रस शोषून घेवून त्यावर उपजीविका करतात. कालांतराने छिद्र पडलेल्या जागेवर गोलाकार चट्टा तयार होतो आणि त्या जागी फळ सडण्यास सुरुवात होते. त्या जागी इतर परोपजीवी बुरशींचा प्रादुर्भाव होतो. मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास ५० ते ६० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे दिसून येते. या पतंगांचा प्रादुर्भाव तुलनात्मकदृष्ट्या उशिराचा आंबिया बहार आणि मृग बहरात जास्त प्रमाणात दिसून येतो. ऑगस्ट ते ऑक्टोबर या पावसाळी कालावधीत प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो.  उपाययोजना :- • बागेच्या सभोवती बांधावरील किंवा नदी नाल्यांच्या किनाऱ्यावरील पावसाळ्यात तयार होणाऱ्या या किडीला पूरक असणाऱ्या वनस्पतींचा नायनाट करावा. • बागेमध्ये पतंगाना आकर्षित करून पकडण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. • पतंगाना मारण्यासाठी १ किलो गुळ+ ६० ग्रॅम व्हिनेगर+ ५० मिली मॅलाथिऑन+१० लिटर पाणी या आमिषाचा वापर करावा. • पतंगांचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर जास्तीत जास्त प्रमाणात पतंग गोळा करून मारणे हे परिणामकारक ठरते. त्याकरिता रात्रीच्या ७ ते ११ आणि पहाटे ५ ते ६ या वेळी बागेत टेंभा (मशाल) किंवा बॅटरीच्या सहाय्याने फळांवर बसलेल्या पतंगाना पकडून गोळा करावेत आणि रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नाश करावा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
31
26
इतर लेख