पशुपालनAgroStar
जनावरांच्या खुरांचे आजार आणि उपाययोजना!
👉🏻जनावरांतील खुरांचे बहुतांश आजार हे व्यवस्थापनातील चुकीमुळे होतात. जास्त वजन असणाऱ्या जनावरांमध्ये पुढील पायांच्या आतील बाजूस आणि मागील पायांच्या बाहेरील बाजूस केराटिनचा थर साचतो. त्या जागेवर खुरांची अयोग्य वाढ होते. याचा जनावरांना त्रास होतो, उत्पादन क्षमता कमी होते.
👉🏻मानवी नखांप्रमाणे जनावरांच्या खुराचे बाहेरील आवरण हे केराटिनपासून बनलेले असते. आवश्यकतेपेक्षा जास्त वाढलेल्या खुरामुळे जनावर लंगडते. अशी जनावरे काम करू शकतात, परंतु त्यांची कार्यक्षमता आणि उत्पादनक्षमता आजाराच्या तीव्रतेनुसार कमी होते.जनावरांचे चारा खाणे मंदावते, पाणी पिणे कमी होते, जनावरांचे वजन घटते, प्रजननक्षमता खालावते, जनावरांची उत्पादनक्षमता कमी होते.
👉🏻जनावरे लंगडण्याची प्रमुख कारणे :
१) पशुखाद्यात अचानक केलेला बदल.
२) पशुखाद्यात तंतुमय घटकांचे कमी प्रमाण.
३) पशुखाद्यात कडधान्यांचे जास्त प्रमाण.
४) पशुखाद्यात क्षारांचे कमी प्रमाण.
५) मेदयुक्त खाद्य.
६) गोठ्यातील अस्वच्छतेमुळे जंतूंचे प्रमाण वाढते. त्यामुळे खुरांचे विविध आजार होतात.
👉🏻प्रतिबंधात्मक उपाय :
- दुधाळ जनावरांना दिवसभरात १० ते १४ तास आराम द्यावा.
- अधिक काळासाठी जनावरांना उभे राहाणे टाळावे.
- जनावरांचा गोठा नेहमी कोरडा आणि स्वच्छ असावा.
- गोठ्यात कमी जागेत जास्त जनावरे बांधू नयेत. प्रत्येक जनावराला योग्य जागा मिळेल याची काळजी घ्यावी.
- आजारी आणि लंगडणाऱ्या जनावरांना मऊ जमिनीवर ठेवावे.
- वर्षातून दोन वेळेस न चुकता खुरांची साळणी करावी.
- पशुखाद्यात बदल करत असताना तो अचानक न करता हळूहळू करावा.
- पशुखाद्यात कडधान्ये एकाच वेळी जास्त प्रमाणात न देता दिवसातून दोन वेळेस विभागून द्यावीत.
- अति बारीक केलेला चारा किंवा कडधान्ये जास्त प्रमाणात खाद्यामध्ये देऊ नयेत.
- पशुखाद्यात जीवनसत्त्व अ, इ, बायोटिन, जस्त,तांबे, मॅंगेनीज,कोबाल्ट यांचा समावेश असावा. या खनिजांमुळे खुरांचे आरोग्य चांगले राहाते.
- खूर सडलेल्या जनावरांना त्वरित वेगळे करावे. गोठा पूर्णपणे निर्जंतुक करून घ्यावा.
- खूर मऊ झालेल्या ठिकाणी पशूतज्ज्ञांच्या सल्ल्याने जंतुनाशक मलम लावावे.
- खुरांचा आजार असलेल्या जनावरांचे पाय ५ टक्के कॉपर सल्फेटच्या द्रावणाने स्वच्छ धुऊन घ्यावेत.
👉🏻संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.