AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गारपीटमुळे नुकसान झालेल्या संत्रा, लिंबू, मोसंबी पिकाचे व्यवस्थापन असे करा.
सल्लागार लेखअ‍ॅग्रोवन
गारपीटमुळे नुकसान झालेल्या संत्रा, लिंबू, मोसंबी पिकाचे व्यवस्थापन असे करा.
➡️ नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसासोबत गारपीट झाल्याने अनेक ठिकाणी संत्रा, लिंबू व मोसंबी बागांचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. नुकसानग्रस्त बागांची काळजी घेण्यासोबतच संत्रा व मोसंबी आंबिया बहाराचे व लिंबू हस्त बहाराचे व्यवस्थापन प्रभावी करणे गरजेचे ठरेल. गारपिटीमुळे बागेमध्ये झाडांची होणारी हानी - ➡️ गारपिटीमुळे झाडांच्या फांद्यावरील आणि खोडावरील सालीला जखमा होतात. या जखमांतून निरनिराळ्या बुरशींचे उदा. प्रामुख्याने फायटोप्थोरा, कोलेटोट्रीकम, डिप्लोडिया, ऑल्टरनेरिया यांचे संक्रमण होऊन रोगांचा प्रसार वाढतो. ➡️ झाडाच्या पानांना मार बसल्यामुळे काही पाने फाटली जातात व काही गळतात. परिणामी, झाडांची सूर्यप्रकाशात अन्ननिर्मितीची प्रक्रिया मंदावते. ➡️ झाडावर मृग बहर ठेवला असल्यास, मृग बहराच्या फळांची व आंबिया बहरातील फुलांची व लहान फळांची गळ होते. सद्यः स्थितीतील आंबिया व मृग बहाराचे नियोजन चालू आहे. ➡️ आंबिया बहाराची फळे बोराएवढी किंवा त्यापेक्षा मोठ्या आकाराची असलेल्या बागेत झाडांना अन्नद्रव्य व संजीवकांची उपलब्धता होऊन फळे चांगली पोसण्यासाठी पोटॅशिअम नायट्रेट (१३:०:४५) १.५ किलो किंवा ०:५२:३४ अधिक जिबरेलीक ॲसिड १.५ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणात आलटून पालटून झाडावर फवारणी करावी. ➡️ आंबिया बहारातील फळांची गळ होत असल्यास जिबरेलीक ॲसिड १.५ ग्रॅम किंवा नॅप्थिल ॲसेटिक ॲसिड (एनएए) १ ग्रॅम आणि युरिया १ किलो प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. ➡️ ढगाळ वातावरणात नवीन नवतीवर सिट्रस सायला या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. परिणामी झाडावरील फूलगळ, फळगळ संभवते. या किडीचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी, संत्र्याला नवीन नवती आल्यानंतर नीम तेल १० मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. जखमा लवकर भरण्यासाठी उपाययोजना ➡️ गारपिटीमुळे फांद्या मोडल्या असल्यास आरीच्या साह्याने व्यवस्थित कापाव्यात. कापलेल्या भागावर बोर्डो पेस्ट (१:१:१०) लावावी. गारपीटग्रस्त झाडांच्या बुंध्यास १ मीटर उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट लावावी. ➡️ झाडाची साल फाटली असल्यास १ टक्का पोटॅशिअम परमॅग्नेट द्रावणाने (१० ग्रॅम प्रति लिटर पाणी) स्वच्छ पुसून घ्यावी. जखमेवर बोर्डो पेस्ट (१:१:१०) लावावी. ➡️ झाडे उन्मळून पडली असल्यास, त्यांना मातीची भर देऊन बांबू किंवा बल्लीच्या साह्याने आधार देऊन उभे करावे. झाडांची मुळे उघडी पडली असल्यास, वाफे नीट करून घ्यावेत. त्यानंतर वाफ्यामध्ये ड्रेचिंग करावे (प्रमाण प्रति लिटर पाणी). संदर्भ:- अ‍ॅग्रोवन. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
6