AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कीड नियंत्रणासाठी निंबोळी अर्क तयार करण्याची पध्दत
जैविक शेतीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कीड नियंत्रणासाठी निंबोळी अर्क तयार करण्याची पध्दत
निंबोळी पावडरचा पाण्यामधून काढलेला अर्क म्हणजेच निंबोळी अर्क – आज सर्वत्र कीड नियंत्रणामधील स्वस्तातले वनस्पतीजन्य कीटकनाशक म्हणून वापरतात. या अर्कचा वापर भाजीपाला पिके, तृणधान्ये, कडधान्ये, गळीत धान्ये, कपाशी अशा सर्व प्रकारच्या पिकांमध्ये कीडनाशक म्हणून केला जातो. निंबोळी अर्क तयार करण्याची पध्दत:- निंबोळ्यांची बारीक पावडर करुन घ्यावी. निंबोळ्य़ा गोळा केलेली नसल्यास किंवा उपलब्ध नसल्यास, बाजारात मिळणारी निंबोळी पावडरचा उपयोग अर्क बनविण्यासाठी करता येतो. वर्षभर अशी निंबोळी पावडर बाजारात उपलब्ध असते. फ़वारणीसाठी नैसर्गिक घटकांचा अर्क हा ५ टक्क्यापर्यंत काढला जातो. ५ टक्के निंबोळी अर्क तयार करण्यासाठी ५ किलो निंबोळी फ़डक्यात बांधून किंवा मोकळी १० लिटर प्लास्टिकच्या बादलीत पाण्यात रात्रभर भिजत ठेवावी. निंबोळी भिजविताना बादली व्यवस्थित झाकून ठेवावी. त्याचबरोबर निंबोळी पावडर भिजविण्यासाठी थंड पाणी वापरावे. कारण गरम पाण्याने निंबोळी अर्कामधील सक्रिय घटक कमी होऊ शकतात. रात्रभर निंबोळी पावडर पाण्यात भिजल्यानंतर व्यवस्थित फ़डक्याने गाळून घ्यावे. गाळून काढलेली निंबोळी पावडर एखाद्या झाडाला खत म्हणून टाकावी. गाळून घेतलेल्या पाण्यात जास्तीचे पानी १०० लिटर होइपर्यंत मिसळावे, अशा प्रकारे १०० लिटर अर्क तयार होईल. हा अर्क फ़वारणीसाठी वापरताना त्यात चांगल्या दर्जाचे स्प्रेडर-स्टीकर टाकावे. यामुळे फ़वारणी व्यवस्थित पिकावर पसरुन उत्तम परिणाम मिळतील. निंबोळी अर्काचे होणारे फ़ायदे:- १) संपूर्णपणे नैसर्गिक स्रोतांपासुन तयार होत असल्यामुळे खर्च अतिशय कमी येतो. २) निंबोळी अर्काच्या फ़वारणीमुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. सर्व प्रकारच्या पिकांवर १५ दिवसांच्या अंतराने नियमीत फ़वारणी घेतल्यास, रस शोषक किडींच्या जीवनचक्रात अडथळा येऊन किडींचे नियंत्रण होते. ३) किडींच्या जीवनचक्रामध्ये पतंगवर्गीय किडींना अंडी घालण्यापासुन परावृत्त केले जाते तसेच रसशॊषक किडींचेदेखील अंडी घालण्याच्या नैसर्गिक क्रियेमध्ये अडथळा येतो. त्यामुळे एकूणच जीवनचक्रामध्ये अडथळा येतो. ४) नैसर्गिक घटक असल्या कारणाने कोणत्याही प्रकारचे रासायनिक अंश राहत नाही. यामुळे सेंद्रिय शेतीमध्ये वापर करण्यास सुलभ आहे. निर्यातीसाठीच्या भाजीपाला पिकामध्येदेखील याची फ़वारणी फ़ायदेशीर ठरते. ५) कीटकनाशकांसोबतदेखील वापरता येत असल्या कारणाने तसेच एकात्मिक कीड नियंत्रण पध्दतीमध्ये वापरण्यास अगदी सोपे असे हे नैसर्गिक कीडनाशक आहे. ६) पांढरी माशी, मावा, फ़ुलकिडे, विविध प्रकारच्या अळ्यांचे देखील नियंत्रण चांगल्या प्रकारे होते. मोठ्या अळ्यांचे नियंत्रणात निंबोली अर्काची जास्त मदत होत नाही यासाठी अळी लहान अवस्थेत असतानाच निंबोळी अर्काची फ़वारणी करावी. श्री.तुषार उगले, कीटकशास्त्रज्ञ
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
516
1
इतर लेख