AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस काढणी भाग १ -  कापसाची वेचणी करतांना घ्यावयाची काळजी!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस काढणी भाग १ - कापसाची वेचणी करतांना घ्यावयाची काळजी!
कापसाला मिळणारा बाजारभाव हा सर्वस्वी कापसाच्या प्रतिवर अवलंबून असतो. कापसाची प्रत राखण्याकरिता वेचणी करतांना काळजी घेणे आवश्यक आहे. वेचणी सुरु झाल्यापासून साधारणतः ३ ते ४ वेचणीत बराचसा कापूस गोळा होतो. आपल्याकडे वेचणी करताना काळजी न घेतल्यामुळे ३० ते ३५ टक्के पालापाचोळा व इतर केरकचरा रुइमध्ये आढळतो. या बाबींचा धाग्याच्या गुणधर्मावर परिणाम तर होतोच त्याचबरोबर कापड गिरणीमध्ये प्रतवारी टिकवण्यास अडचण निर्माण होते.  कापसाची वेचणी करतांना घ्यावयाची काळजी :- 1. कापूस वेचणी ठराविक कालावधीत केल्यास चांगल्या प्रतीचा कापूस मिळतो. जास्त दिवस कापूस झाडावर राहिल्यास त्याला पालापाचोळा, हवेतील धुळीचे कण, बोंड जमिनीवर पडल्यास मातीचे कण चिकटतात व त्यामुळे कापसाची प्रत खराब होते. 2. वेचणी हि सकाळी किंवा दुपारी उशिराने करावी, जेणेकरून कापसाला पालापाचोळा चिकटून येणार नाही, बोंडे वेचतांना पालापाचोळा चिकटल्यास त्याचवेळी काढावे व स्वच्छ कापूस गोळा करावा. 3. अपरिपक्व व अर्धवट उमललेल्या बोंडातील कापसात पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अशा बोंडातील कापूस वेचून तसाच साठविल्यास रुईला पिवळसरपणा येतो व कापसाची प्रत खालावते. शिवाय अशा कापसाच्या सरकीचे आवरण टणक नसल्यामुळे गलाई करतांना सरकी फुटते व ती रुइमध्ये मिसळते व रुईची प्रत खराब होते. 4. परिपक्व व पूर्ण फुटलेल्या बोन्डातील कापसाची प्रत चांगली असते आणि या कापसापासून मिळणाऱ्या रुई आणि धाग्याची प्रत उच्च दर्जाची असते. म्हणूनच कापसाच्या तसेच रुईच्या दर्जेदार उत्पादनाकरीता वेचणी करतांना पूर्णतः परिपक्व आणि पूर्ण उमललेल्या बोन्डातील कापूस वेचणी करावी. 5. कपाशीची वेचणी करतांना झाडाची पत्ती, पालापाचोळा चिकटून येतो, काही वेळा नख्यासह कापसाचे बोंड वेचणी केले जाते. अशा प्रकारच्या विक्रीस आणलेल्या कपाशीमध्ये झाडाची पाने, पालापाचोळा, नख्या, माती इ. अनावश्यक बाबी असल्यास कपाशीच्या प्रतीवर परिणाम होतो. 6. पावसाने किंवा किडीने खराब झालेला कापूस वेचून वेगळा ठेवावा किंवा त्याची वेगळी वेचणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
26
2