फळ प्रक्रियाकृषी जागरण
कांदा प्रक्रिया उद्योगाबाबत सविस्तर माहिती!
कांदा प्रक्रिया उद्योग:-
करोनाने व्यापलेल्या या संकटाच्या काळातील समस्येचे समाधान शोधण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कांदा आधारित प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीचा निर्णय घ्यावा. कांदा हे व्यापारिदृष्टया सर्वात महत्वाचे भाजीपाला पिक आहे. भारतात सर्वाधिक कांदा उत्पादन हे महाराष्ट्रात तर महाराष्ट्रातील सर्वाधिक कांदा उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होतेनाशिक पाठोपाठ पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर, सातारा हे जिल्हे कांदा पिकविण्याबाबत प्रसिध्द आहेत. तसेच मराठवाडा विदर्भ व कोकणात सुध्दा काही जिल्हयांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. महाराष्ट्रात विविध हगंमातील कांदा वर्षभर बाजारपेठेत येत असतो. कांदा सुद्धा नाशवंत पदार्थ आहे, पण भारतीय कांद्याचे काही वैशिष्ट्य आहेत. अधिक तिखटपणा, अधिक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट यामुळे भारतीय कांद्याचे पोषणमूल्ये अधिक आहेत. कांद्याचे विविध प्रकारे मूल्यवर्धन करून नेहमी पेक्षा अधिक नफा शेतकरी मिळवू शकतील.
• कमीत कमी प्रक्रिया केलेले कांदे : कांदे सोलून किंवा कापून त्यांच्यात प्रिझर्वेटिव्हस (परिरक्षके) वापरली जातात. असे सोललेले किंवा कापलेले कांदे उत्तम पॅकेजिंगद्वारे अधिक काळ ताज्या स्वरूपामध्ये राहू शकतात.सोललेले कांदे ५ टक्के उर्ध्वपातित व्हिनेगारच्या द्रावणाचा वापर करून संरक्षित केले जातात. कापलेल्या कांद्यांसाठी पोटॅशियम सल्फेटचा (०.२५ टक्के) प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापर केला जातो.
• कांदा पेस्ट :- बदलत्या जीवनशैलीमुळे कांदा पेस्टला मागणी वाढत आहे. पेस्ट तयार करण्यासाठी कापलेले कांदे तेलामध्ये तळून घेतले जातात. नंतर मिक्सरमधून काढून त्यांची पेस्ट केली जाते. कांदा पेस्ट केल्यामुळे कांद्याची साठवणक्षमता वाढते. स्वयंपाकातही वापरण्यास कांदा पेस्ट सुलभ जाते…
• निर्जलित (डिहायड्रेटेड) कांद्यापासून पावडर व फ्लेक्स (काप):- कांद्याचे निर्जलीकरण केल्याने सूक्ष्मजीववाढीस प्रतिबंध होऊन कांद्याची साठवणक्षमता वाढते; तसेच त्याचे आकारमान कमी होत असल्याने वाहतुकीसाठी सोपे जाते. निर्जलीकरणामुळे कांद्याची आर्द्रता कमी होते. अशा कांद्यांना योग्य प्रकारे काप देऊन, फ्लेक्स किंवा भुकटी तयार करता येते. डिहायड्रेटेड कांद्याचे फ्लेक्स आणि पावडर हे वातावरणातील आर्द्रता शोषून घेणारे आहेत, त्यामुळे त्यासाठी योग्य पॅकेजिंग तंत्रज्ञान वापरणे अत्यावश्यक आहे. अशा कांदा भुकटी किंवा कापांच्या निर्यातीला मोठा वाव आहे.
• लोणचे : व्हिनेगर किंवा तेलाचा वापर करून कांद्याचे लोणचे तयार करता येते. अमेरिका आणि युरोप बाजारपेठेमध्ये व्हिनेगर वापरून, तर आशिया-आफ्रिका बाजारपेठेमध्ये तेल वापरून बनवलेले कांद्याचे लोणचे लोकप्रिय आहे.
• तेल: कांद्यापासून तेलसुद्धा तयार करता येते. प्रक्रियाकृत उत्पादनांमध्ये कांद्याचा स्वाद आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या तेलाचा वापर होतो. काही उत्पादनांमध्ये प्रिझर्वेटिव्ह (संरक्षक) म्हणूनही त्याचा वापर केला जातो…
कांदा प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक यंत्रे:-
• पिलिंग मशिन (साल /बाह्य आवरण काढण्याचे यंत्र):- कांद्यावरील बाह्य आवरण म्हणजेच त्यावरील साल काढण्याकरिता या यंत्राचा वापर केला जातो. हे एक स्वयंचलित यंत्र असून, याची क्षमता ५० किलो प्रतितासपासून पुढे आहे. आपल्या भागातील उपलब्ध कांदा आणि त्यावरील प्रक्रिया या अनुषंगाने आवश्यक त्या क्षमतेची यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत.या यंत्राची किंमत अंदाजे २० हजारांपासून पुढे क्षमतेनुसार वेगवेगळी असू शकते.
• कांदा रूट आणि हेड कटिंग मशिन (मुळे व शेंडा कापण्याचे यंत्र):- हे स्वयंचलित यंत्र वापरून कांद्याची मुळे व शेंडे कापण्यात येतात. या यंत्राची क्षमता १०० किलो प्रतितासपासून पुढे असून किंमत १५ हजारांपासून सुरू होते.
• कांदा वॉशिंग मशिन (धुण्याचे यंत्र)-बाह्य आवरण आणि मुळे काढलेला कांदा धुण्यासाठी या यंत्राचा वापर केला जातो. यामुळे कांद्यावरील धूळ व अन्य खराब घटक निघून कांदा स्वच्छ होईल. हे यंत्र स्वयंचलित आहे. याच्या किमती १५ हजार रुपयांपासून सुरू होऊन क्षमतेनुसार कमी- अधिक होऊ शकतात.
• कांदा कटर किंवा स्लाइसर यंत्र (कांद्याच्या चकत्या करण्याचे यंत्र):- या यंत्राद्वारे कांद्याच्या लहान चकत्या केल्या जातात.निर्जलीकरणादरम्यान पाण्याचे प्रमाण लवकर कमी होण्यासाठी चकत्यांची जाडी ही ०.३ ते ०.६ सेंमी असावी. हे यंत्र स्वयंचलित असून, या यंत्राची किंमत १० हजारापासून पुढे क्षमतेनुसार कमी- अधिक असू शकते.
• डिहायड्रेटर किंवा ड्रायर (कांदा वाळवण्याचे यंत्र:- डिहायड्रेटर किंवा ड्रायरमध्ये पदार्थातील पाण्याचे प्रमाण कमी केले जाते. कांद्याच्या चकत्या वाळवण्यासाठी ट्रे ड्रायर किंवा सोलर ड्रायर वापरले जातात. कांद्याच्या चकत्या ५५ अंश सेल्सिअस तापमानाला १० ते १२ तासांकरिता ड्रायरमध्ये ठेवल्या जातात. याची क्षमता ही ट्रेच्या संख्येवर अवलंबून असते. जितके जास्त ट्रे तितकी जास्त क्षमता, तितकी किंमत जास्त असते. बाजारात सध्या १२, २४, ४८, ९६, १९२ ट्रे असणारे ड्रायर उपलब्ध आहेत. काही कंपन्यांमार्फत वरील सर्व यंत्रे एकत्रित किंवा वेगवेगळी उपलब्ध होऊ शकतात.
• ग्राइंडर (गिरणी) :- वाळवलेल्या चकत्यांपासून ग्राइंडरद्वारे भुकटी बनवली जाते. ग्राइंडरची क्षमता ही ५० किलो प्रतितासपासून पुढे उपलब्ध आहे. ५० किलो प्रतितास क्षमतेच्या ग्राइंडरची किंमत ही २० हजार रु. आहे. एकूण ५ ते १० लाखांपर्यंत गुंतवणूक केल्यास शेतकरी किंवा शेतकरी गट कांदा प्रक्रिया उद्योग सुरू करू शकतात. या प्रक्रिया पदार्थांच्या दरामध्ये बऱ्यापैकी स्थिरता असल्याने ताज्या कांद्याच्या तुलनेमध्ये आर्थिक स्थिरता मिळू शकते. या छोट्या उद्योगाच्या साह्याने सामान्य शेतकऱ्यांना कांद्याच्या दरातील चढ-उतारावर काही प्रमाणात तरी मात करणे शक्य होईल, अशी आशा आहे.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- कृषी जागरण
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.