सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ऊसावरील पांढरा लोकरी मावा किडीचे व्यवस्थापन
ऊस पानांच्या खालील बाजूस मावा आढळतो. पंखी माव्याची मादी काळसर, तर बिनपंखी माव्याची मादी पांढरट दिसते, म्हणून त्यास पांढरा लोकरी मावा म्हणतात. या किडीचा प्रसार, वारा, मुंग्या, किडग्रस्त पाने किंवा बेणे याद्वारे होतो. नुकसानीचा प्रकार: पिल्ले आणि प्रौढ माद्या ऊसाच्या पानाखाली स्थिर राहून रस शोषतात. त्यामुळे पीक निस्तेज होते व पानांच्या कडा सुकतात. पानावर काळी बुरशी वाढून पाने काळी होतात. उपद्रव अति झाल्यास ऊस कमकुवत होतो, वाढ खुंटते, ऊस उत्पादन व साखर उताऱ्यात घट होते. अनुकूल वातावरण: ढगाळ हवामान, ७० ते ९५% सापेक्ष आर्द्रता असे हवामान लोकरी माव्याच्या वाढीस अनुकूल आहेत. प्रादुर्भाव जूनपासून वाढत जाऊन सप्टेंबरमध्ये सर्वात जास्त असतो. नियंत्रणाचे फायदे: • प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रातील ऊस बियाणे नवीन ऊस लागवडीसाठी वापरू नये. • ऊसाची लागवड पट्टा किंवा रुंद सरी पद्धतीने करावी म्हणजे या किडीच्या व्यवस्थापनास मदत होईल. • सुरुवातीस पानांवर लोकरी मावा आढळल्यास, ती प्रादुर्भावग्रस्त पाने काढून जाळून टाकावीत. • ऊस पिकासाठी जास्त प्रमाणात पाण्याचा वापर टाळावा, आवश्यकतेनुसार ऊसास पाणी द्यावे. • शिफारशीप्रमाणे संतुलित रासायनिक खतांचा वापर करावा. नत्रयुक्त खतांच्या जास्त मात्रा देऊ नयेत तसेच शेणखत व गांडूळखत २० टन प्रति हेक्टरी वापरावे. • लेडी बर्ड बीटल, हिरव्या तांबूस जाळीदार पंखाचे कीटक, सिरपीड माशी, पतंगवर्गीय मावा खाणारी अळी यांसारख्या नैसर्गिक वाढणाऱ्या परभक्षक कीटकांची जोपासना करावी. • परभक्षक कीटक सोडलेल्या क्षेत्रामध्ये रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळावी. • परभक्षक कीटकांची वाढ झालेली नाही व लोकरी माव्याचा प्रादुर्भाव जास्त झाला असेल, अशा क्षेत्रामध्ये पिकाची लहान अवस्था असताना किडींच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस ५०% + सायपरमेथ्रीन ५% ईसी @२ मिली प्रति लिटर पाण्याच्या प्रमाणाने फवारणी करावी किंवा पिकास ठिबक सुविधा उपलब्ध असल्यास थायोमेथॉक्झाम २५% डब्ल्यूजी @५०० ग्रॅम प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे. • ऊस पीक सहा महिन्याचे होईपर्यंत थायमेट १०% जमिनीतून वापरावे. • ऊस पिकाची तोडणी झाल्यानंतर शेतीमध्ये हिरवे धुमारे/ फुटवे तसेच पाचटाखाली हिरवे वाडे राहणार नाही, याची काळजी घ्यावी. शेतीतील पाचट मात्र जाळू नये. कारण वाळलेल्या पाचटावर ही कीड जगू शकत नाही. संदर्भ -
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
233
2
इतर लेख