AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आळिंबी (मशरूम) लागवड
सल्लागार लेखकृषीसमर्पण
आळिंबी (मशरूम) लागवड
भारतामध्ये मशरूमचे उच्च तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन नुकतेच सुरु झाले आहे. जागतिक बाजारपेठदेखील उपलब्ध झाली आहे. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे. कारण ते संपूर्णतः शाकाहारी असून त्यापासून कमी कॅलरीज, प्रथिने, लोह, खनिजपदार्थ, जीवनसत्त्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात. मशरूम वरील संशोधनानंतर मशरूममध्ये ‘अॅन्टी व्हायरल’ व ‘अॅन्टी कॅन्सर’चे विशेष गुणधर्म आढळून आले आहेत. भारतामध्ये बटन, शिंपला, धानपेढ्यांवरील या जातीच्या मशरूमची लागवड केली जाते. लागवड प्रक्रिया : १. काड भिजवणे : (भाताचे काड, गव्हाचे काड, ज्वारीचा कडबा, गवत, सूर्यफुलाची ताटे, नारळाची पाने, उसाचे पाचट, बाजरीची पाने) प्रथम काड लांब असल्यास त्याचे ३-५ सें.मी. चे तुकडे करावेत. यानंतर थंड पाण्यात १०-१२ तास भिजवावे. भिजलेले काड बाहेर काढून निर्जंतुक करावे. निर्जन्तुकीकरणा करिता गरम पाण्यात १ तास ठेवावे. २. बी पेरणे : प्लास्टिकच्या पिशवीत काडाचा थर द्यावा. अंदाजे दोन ते अडीच इंच. नंतर त्यावर पिशवीच्या कडेने बी पेरावे. बीच्या थरावर पुन्हा काडाचा थर द्यावा. पुन्हा बी चा थर असे करून पिशवी भरावी. बी पेरताना ओल्या काडाच्या २% प्रमाणात पेरावे. पिशवी भरताना काड दाबून भरावे. पिशवी भरल्यावर दोऱ्याच्या सहाय्याने तोंड बांधावे व पिशवीला २५-३० छिद्रे मारावीत. छिद्रे पाडताना दाभान किंवा गंज नसलेल्या सुईचा वापर करावा. ३. उबविणे : बुरशीच्या वाढीकरिता उबविणे ही महत्वाची क्रिया आहे. बी पेरून बांधलेल्या पिशव्या निर्जंतुक खोलीत ठेवाव्यात. खोलीत अंधार ठेवावा व तापमान २२ ते २६ अंश सेल्सियस ठेवावे. ४. पिशवी काढणे : पिशवीमध्ये बुरशीची पूर्ण वाढ झाल्यावर ती पांढरी दिसते. ती ब्लेडने कापून काढावी व रॅकवर ठेवावी. खोलीमध्ये अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश (संधीप्रकाश) व हवा खेळती ठेवावी. पिशवीतून काढलेल्या बेडवर एक दिवसानंतर पाण्याची हळुवार फवारणी करावी. दिवसातून ३-४ वेळा पाण्याची फवारणी करावी. फवारणी करण्याकरिता पाठीवरचा स्प्रे पंप किंवा हॅन्ड स्प्रेचा वापर करावा. ५. काढणी : मशरूमची पूर्ण वाढ पिशवी फाडल्यानंतर ४-५ दिवसांत होते. वाढ झालेले मशरूम हाताने उजवीकडे किंवा डावीकडे वळवून काढावेत. मशरूम काढल्यानंतर बेड(पिशवी) एक ते दीड इंच खरडावा व पाणी द्यावे. १० दिवसांनी दुसरे पीक परत १० दिवसांनी तिसरे अशी तीन पिके मिळतात. एका बेड (पिशवी) पासून ९०० ते १५०० ग्रॅमपर्यंत ओली आळिंबी मिळते. शिल्लक राहिलेल्या बेडचा वापर झाडांना खत, जनावरांना पौष्टिक चारा म्हणून करण्यात येतो. संदर्भ : कृषीसमर्पण
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
367
1