सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आपण कृषी प्रधान देशात राहतो!!!
देशात शेती हा विषय आला की या विषयाशी एक वाक्य हमखास लिहिले जाते की, ‘भारत हा कृषी प्रधान देश आहे’ हे वाक्य लहानांपासून ते मोठयांपर्यंत सर्व व्यक्तींनी मनात ठासून बसविले आहे. मात्र हे वाक्य कितपत सत्य आहे याचा अनुभव नुकताच युरोपमध्ये आला. मला सहकाऱ्यांसोबत ट्रेनिंग या उद्देशाने युरोपमधील नेदरलँड या देशामध्ये जाण्याचा योग आला. या देशात आठवड्याभराच्या मुक्कामानंतर खूप गोष्टी बघायला तसेच शिकायला मिळाल्या. कारण आमचा संपूर्ण वेळ कृषी क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान पाहणीसाठी असल्यामुळे अनेक शेती तंज्ञ, शेतकरी, शेती कामगार यांच्याशी संपर्क झाला. या माध्यमातून अतिशय शिस्तप्रिय, शांत आणि कामसू वाटणारी डच लोक अनुभवण्याचा योग आला. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यावर मायदेशी निघताना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नाश्ता करताना एक पाटी वाचली. वरवर सरळअर्थी वाटणारी पाटी मनात विचारांचे काहूर करून गेली. सदर पाटीवर असे लिहिले होते की, ‘हा नाश्ता आपल्या डच(युरोपियन) शेतकरी आणि त्यांच्या समूहाला आधार देतो’ आणि पाटीच्या चहू बाजूंनी भांडयात ठेवलेली फळे, टोमॅटो, काकडी सलाड, परदेशी पालेभाज्यांचे सलाड, दुधाचे विविध पदार्थ (जसे की, ताक, दही, लोणी) सोबतच अनेक फळांचे ज्युस, मध इत्यादी ठेवले होते. या पाटीवर आणखी काही गोष्टी नमूद केल्या होत्या. जसे की, ‘ही उत्पादने स्थानिक आहेत, कोणत्याही प्रकारची अनैसर्गिक साखर वापरली नाही, सर्वांचे पॅकिंग सहज विघटन होऊन पर्यावरणपूरक आहे.’ ज्या फार्ममधून हे सगळे आणले होते त्यांच्या व हॉटेलच्यावतीनेदेखील काही ओळी लिहिलेल्या ‘समाजामध्ये रोजगाराच्या निमित्ताने काहीश्या दूर गेलेल्या व घरापासून अंतरावर राहणाऱ्यांसाठी परिपूर्ण जागा तयार करतो. या ठिकाणी विलक्षण उत्कटता असलेली लोक सर्वात स्वादिष्ट व गुणवत्तापूर्ण पदार्थ तयार करतात!’ त्याचबरोबर त्याच पाटीवर सर्वात शेवटी लिहीले होते की, ‘नवीन पिढीतील तरुण-तरुणींना प्रोत्साहित करण्यात येते की, निरोगी अन्न, शेतकरी व शेती यांचे नाते अतूट व अबाधित राखा’. मित्रांनो ही खूप लहान वाक्य असले, तरी प्रचंड सामाजिकतेचे भान ठेऊन केलेला हा विचार व कृती आहे. खरचं हे सर्व पाहून मनात विचार आला की, आपल्या देशात ग्राहकांना ना कुठला अधिकार, ना शेती उत्पादकांना कुठला न्याय, मग आहे का खरचं आपला देश कृषी प्रधान? विचारांनी प्रगल्भ असणारे आपण भारतीय कृतीने आहोत का खरचं परिपक्व? शेतीतून उत्पादित होणारा माल खरोखरचं निरोगी आहे का? विषमुक्त अन्न आपण उत्पादित करतो का? ग्राहकांना तरी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची खरोखर किंमत आहे का? हातगाडी, फुटपाथवर भाजीपाला कवडीमोल भावाने विकत घेऊन वातानुकुलीत दुकानांमध्ये कपडे, चपला व सौंदर्यप्रसाधने महागड्या किंमतीत नेताना सामाजिक बांधिलकी ग्राहक खरोखर जपतो का? असे सगळे चित्र पाहून आपल्या कृतीत बदल करायचा की फक्त मान्य करत राहायचे की भारत कृषी प्रधान देश आहे! हे वाक्य दोघांसाठी एक म्हणजे ज्यांना कृषीप्रधान मान्य आहे त्यांना कृषी प्रधान काय असते हे खोलवर रुजण्यासाठी. दुसरे म्हणजे कृषी प्रधान देश आहे हे मान्य न करणाऱ्यांना सत्यता नेमकी आहे काय हे समजण्यासाठी हा लेख नक्कीच हातभार लावेल अशी आशा आहे. तेजस कोल्हे
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
397
0
इतर लेख