AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अधिक पावसामुळे उद्भवलेल्या सोयाबीन पिकातील समस्या, उपाययोजना.
सल्लागार लेखअ‍ॅग्रोवन
अधिक पावसामुळे उद्भवलेल्या सोयाबीन पिकातील समस्या, उपाययोजना.
गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सतत व अधिक पावसामुळे सोयाबीन पिकामध्ये काही समस्या दिसून येत आहेत. त्यात सोयाबीनचे पीक अचानक पिवळे पडणे, वाळणे व शेंगांचे प्रमाण कमी होणे अशा समस्यांचा समावेश आहे. सोयाबीन पिकांमध्ये काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे सोयाबीनच्या मुळांना जमिनीतील अन्नद्रव्य शोषताना अडथळा येत असल्यामुळेही सोयाबीन पिवळे पडत आहे. काही भागात पिवळा मोझॅक व्हायरस या रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाडे पिवळी पडत आहेत. उपाययोजना: १) अधिक पावसामुळे ज्या शेतात पाणी साचलेले आहे, ते प्रथम बाहेर काढण्याची व्यवस्था करावी. २) सद्यःस्थितीत बऱ्याच जमिनीत अतिरिक्त ओलाव्याची स्थिती आहे. परिणामी सोयाबीनच्या मुळांना जमिनीतील पोषणद्रव्ये शोषण्यात अडथळे येत आहेत. या सोबतच सततच्या ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश अपुरा पडल्याने सोयाबीन पिकाच्या प्रकाशसंश्लेषण क्रियेवर त्याचा विपरीत परिणाम झाला. परिणामी सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत. अशा पानांच्या शिरा मात्र हिरव्या राहतात. अशा परिस्थितीमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता लक्षात घेता, विशेषतः नत्र व पालाश यांचा पुरवठा करण्यासाठी १३ः०ः४५ (पोटॅशियम नायट्रेट) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. ३) काही भागात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीद्वारे होतो. तो रोखण्यासाठी पिकाच्या प्रारंभिक अवस्थेमध्येच शेतात विविध ठिकाणी पिवळे चिकट सापळे लावावेत. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी, पिकावर पिवळा मोझॅक व्हायरस या रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. अशा शेतात पांढऱ्या माशीच्या नियंत्रणाकरिता,बीटासायफ्लुथ्रिन (८.४९ टक्के) अधिक इमिडाक्लोप्रीड (१९.८१ टक्के ओ.डी.) (संयुक्त कीटकनाशक) ०.७ मिली प्रति लिटर पाणी फवारणी करावी (भारतीय सोयाबीन संशोधन संस्था, इंदोर यांची शिफारस). ५) काही भागात सतत होत असलेल्या रिमझिम पावसाच्या स्थितीमुळे पाने खाणाऱ्या अळ्या पानासोबतच शेंगाचेही नुकसान करत आहेत. त्यामुळे अफलन (शेंगा नसणे) स्थिती तयार होत आहे. विशेषतः मध्यम कालावधीच्या वाणांमध्ये ही स्थिती जास्त प्रमाणात आहे. अशा प्रकारच्या पिकामध्ये दुसऱ्यांदा फुले व शेंगा येण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये पिकाचे उत्पादन किमान ५० ते ६० टक्के घेण्याकरिता आवश्यकतेनुसार सिंचन व कीड व्यवस्थापनाचे उपाय करावेत.
संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
25
9