AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
30 Oct 19, 01:00 PM
कृषि वार्तापुढारी
साखर कारखान्यांना निर्यातीची मोठी संधी
पुणे – भारतातून कच्ची साखर आयात करण्यास चीन उत्सुक असून, दिल्ली येथे नुकत्याच येऊन गेलेल्या चीनच्या शिष्टमंडळाने ५० हजार टन कच्च्या साखर आयातीचा करार केलेला आहे. चीनचे दहा सदस्यीय आणखी एक शिष्टमंडळ दिल्ली येथे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या कार्यालयात २३ नोव्हेंबरला साखर आयातीच्या करारासाठी येत आहे. चीनला किमान ५० लाख टनाइतक्या कच्च्या साखरेची आवश्यकता असल्याने सहकारी व खासगी साखर कारखान्यांना निर्यात कराराची मोठी संधी चालून आलेली आहे. साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे म्हणाले की, चीनकडून होणाऱ्या कच्च्या साखर आयात करारामध्ये प्रामुख्याने साखर निर्यात करताना जागतिक बाजारात असणाऱ्या बाजारभावानुसार निर्यात दर राहणार आहे. सध्या कच्ची साखर निर्यात करावयाची झाल्यास कारखाना स्थळावर प्रतिक्विंटलला १९५० ते २००० रू. भाव कारखान्यांना मिळणार आहे. शिवाय साखरप्रक्रिया खर्च वाचणार असून, बॅंकांच्या व्याजाच्या रकमेचीही बचत होऊन फायदा होईल. तसेच केंद्र शासनाने ६० लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिलेली आहे. त्याची सुरूवात १ ऑक्टोबरपासून झाली आहे, त्यामुळे इच्छुक कारखान्यांनी २३ नोव्हेंबरच्या चीन व भारताच्या साखर निर्यात कराराच्या बैठकीस महासंघाच्या दिल्ली येथील कार्यालयात उपस्थित राहावे असे ही त्यांनी यावेळी सांगितले. संदर्भ – पुढारी, २८ ऑक्टोबर २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
44
0