AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
17 Jan 19, 01:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
देशातील पहिल्या ‘कॉम्प्रेस्ड बायोगॅस’ प्रकल्प उभारणीस प्रारंभ
पुणे : देशात पाच हजार ‘कॉम्प्रेस्ड बायोगॅस’ अर्थात सीबीजी प्रकल्प उभे करण्याचे ध्येय केंद्र शासनाने ठेवले आहे. खर्चिक आयात इंधानाला पर्याय देण्यासाठी पावणे दोन लाख कोटी रूपयांची गुंतवणूक करून हे प्रकल्प उभारण्यात येणार आहे, मात्र याची सुरूवात पुणे येथे नुकतीच झाली आहे. या देशातील पहिल्या ‘सीबीजी डेमो’ प्रकल्पाच्या कामाला प्रख्यात शास्त्रज्ञ व केंद्र शासनाचे ‘हायड्रोकार्बन’ विषयाचे सल्लागार डॉ. अनिल काकोडकर उपस्थित होते. डॉ. काकोडकर म्हणाले,‘‘देशाच्या जैव ऊर्जा निर्मितीला दुसऱ्या पिढीतील तंत्रज्ञानातून चालना मिळाली आहे. त्यात प्राजचा वाटा मोलाचा आहे. प्राजच्या पथदर्शक प्रकल्पात वापरली जाणारी उच्च दर्जाची अभियांत्रिकी कौशल्ये वाखाणण्याजोगी आहेत. बायो इथेनॉल हे द्रव इंधन आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस हे वायूइंधन यांची परस्परपूरक निर्मिती करण्याची कल्पना चांगली आहे. त्यात जैविक कचऱ्याचा भरपूर वापर करून घेता येईल. यामुळे हायड्रोकार्बन्सची आयात कमी होईल,’’ असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हा प्रकल्प जागतिक दर्जाच्या ‘प्राज’ इंडस्ट्रीजकडून पुण्याजवळील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या आवारात उभारल्या जाणाऱ्या या ‘इंटिग्रेटेड सीबीजी डेमो प्लॅन्ट’ चे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले. हा कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प सध्याच्या सीएनजीला पर्यायी इंधन म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे, तसेच प्राजच्या सीबीजी प्रकल्पात बायोमास, शेतातील काडीकचरा, कागद गिरणीची कचरा यांपासून सीबीजी कसा तयार करता येईल, याविषयी चाचण्या घेतल्या जाणार आहेत. संदर्भ – अॅग्रोवन, ११ जानेवारी २०१९
72
0