सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
चरितार्थासाठी नव्हे तर व्यवसायासाठी शेती!
काही महिन्यापूर्वीच नेदरलॅंड या देशातील शेतकऱ्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांची शेती करण्याची पद्धत फार जवळून पाहता आली. विशेष म्हणजे येथील शेतकरी पिण्यासाठी साधे कुठल्याही नळाचे पाणी वापरतात, मात्र शेतीला ते आपल्या साध्या भाषेत सांगायचे झाले तर बिसलेरीचे पाणी वापरतात. कारण येथे शेती फक्त चरितार्थासाठी नव्हे तर व्यावसायिक दृष्टीकोनातून केली जाते. पिकांचे आरोग्य बिघडणार नाही यासाठी ही सगळी धडपड डच लोक करत असतात. आपल्याकडे शेतीबाबत एवढी काळजी घेतली जाते का? भारतीय शेतीला लाभलेले सर्वात मोठे वरदान कोणते असेल तर ते आहे मान्सून. आपल्याकडे जून महिन्यात येणारा मान्सून शेतीसाठी वर्षभर पाणी उपलब्ध करून देतो. ठराविक शेतकरी पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करतात परंतु बरेचसे शेतकरी पडणाऱ्या पावसाचे कुठलेही नियोजन करताना दिसत नाहीत. नेदरलँड (युरोप) मध्ये मान्सून प्रमाणे कुठलाही पाऊस नियमित नसतो. त्यांच्याकडे वर्षभरात केव्हाही पडणारा पाऊस आणि थंडीत अक्षरशः बर्फ वृष्टी होते, अशा प्रतिकूल स्थितीमध्ये तेथील शेतकरी बहुतांशी शेती संरक्षित म्हणजेच काच गृहामध्ये करतात. ज्याला आपण पॉलीहाऊस संबोधतो. ज्यात तापमान, आर्द्रता, प्रकाश सर्व काही नियंत्रित असते. उणे ५ अंश तापमान असतानाही त्यांच्या काच गृहामध्ये पीक उत्पादन चालूच असते. नेदरलँडमधील काच गृह रचना अशी आहे की, त्यावर पडणारे पावसाचे सर्व पाणी जमा करता येते व हे जमा झालेले हजारो लिटर पाणी शेजारीच बांधलेल्या शेत तळ्यामध्ये साठवणूक केली जाते. कुठल्याही स्थितीत असे पाणी साठवणे उत्पादक शेतकऱ्यांना बंधनकारक आहे. जर एखादा शेतकरी असे पाणी साठवत नसेल (रेन वॉटर हार्वेस्टिंग) तर त्याचे दुष्परिणाम त्याच शेतकऱ्याला भोगावे लागतील. कारण संपूर्ण शेतीला गुणवत्तापूर्ण योग्य सामू (pH) आणि विद्युत वाहकता (EC) असलेले पाणी उपलब्ध करणे अवघड होऊन बसते. पावसाच्या पाण्याची गुणवत्ता हीच चांगली असल्याने ते पाणी देणे सोयीस्कर असते. जर असे पाणी नसेल, तर संपूर्ण शेतीला फिल्टर RO चे पाणी देणे भाग पडते. गेल्या ५ वर्षात आपल्याकडे पर्जन्यमान नियमित होताना दिसत नाही, कमी-अधिक होणारी वृष्टी आणि वादळांचे वाढलेले प्रमाण ही शेतीसाठी संकटे आहेतच. मग आपल्याला भेटलेली सुपीक मृदा, मान्सून, वैविध्यपूर्ण हवामान, वर्षभर जवळपास सारखा आणि पुरेसा सूर्यप्रकाश इतके सारे जमेच्या गोष्टी असूनही शेतकरी आणि शेती संकटांमध्ये दोलायमान कसा? भारतामध्ये प्रत्येक शेतकरी लाखो रुपये खर्च करून अशा पद्धतीचे काच गृह उभारणी करू शकत नाही किंवा तशी आवश्यकता पण नाही. मात्र गरज आहे आपल्याला ती नेदरलॅंडच्या शेतकऱ्यांची मानसिकता आणि दृष्टीकोन समजून घेण्याची व योग्य असे आत्मसात करण्याची. आपणही शेतीला व्यवसाय समजून सर्व अत्यावश्यक बाबी वेळोवेळी करून निश्चितच उत्पादन वाढू शकतो. जसे की, माती परीक्षण, पाणी गुणवत्ता तपासणी, पिकांची फेरपालट, जल संधारण, विहीर पुर्नभऱण, सेंद्रिय खत निर्मिती, हिरवळीच्या खतांचा अंतर्भाव करणे, मित्र कीटक संगोपन करून कीटकनाशक- बुरशी नाशक वापर कमी करणे, मध माशी सारखे नैसर्गिक मित्रांना हानी पोहचू न देता परागीकरण वाढवणे इत्यादी. या गोष्टी सहज शक्य आणि कमीत कमी खर्चिकदेखील आहेत. संदर्भ – वरिष्ठ कृषी तंज्ञ तेजस कोल्हे
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
312
0
संबंधित लेख