सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भाजीपाला पिकांची निरोगी रोपे कशी तयार करावी?
• भाजीपाला पिकांमध्ये दर्जेदार व निरोगी रोपांच्या निर्मितीसाठी व उत्पादन वाढीसाठी योग्य रोपवाटिका तयार करणे गरजेचे आहे. • ज्या ठिकाणी आपल्याला शेडनेट तसेच कोकोपीट, प्लास्टिक ट्रे उपलब्ध होऊ शकत नाही त्या ठिकाणी शेतामध्ये योग्य जागा निवडून गादी वाफे तयार करावे. • जागा निवडताना उंच वाढलेल्या झाडाच्या खाली अथवा बांधाच्या कडेला किंवा एकदम पाणथळ जागा नसेल याची काळजी घ्यावी. • गादीवाफे तयार करण्या पूर्वी शेतामध्ये एक नांगरणी व दोनदा कुळवणी करावी तसेच अगोदरच्या पिकाचा काडीकचरा काढून नष्ट करावा. मातीमध्ये ढेकळे अथवा दगड-गोटे राहणार नाहीत याची विशेष दक्षता घ्यावी. मशागत करतानाच त्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत मिश्र करून घ्यावे. • जमिनीच्या प्रकार, खोली व उतारानुसार नुसार कमीत कमी ३ मीटर लांबी, १ मीटर रुंदी व १५ ते २० सेंमी उंचीचे गादीवाफे तयार करावेत. • त्यानंतर प्रत्येक वाफ्यात २५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, १५० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश, ५० ग्रॅम युरिया व कीटकनाशक टाकावे. जेणेकरून सुरुवातीच्या काळात रोपांची चांगली जोमदार वाढ होईल व कीड बुरशींपासून रोपांचे रक्षण होईल. • त्यानंतर गादीवाफ्यावर ५ सेंमी अंतरावर रेषा पडून त्यामध्ये भाजीपाला पिकाचे बियाणे रांगोळी सारखे टाकावे व हलक्या हाताने बियाण्यावर माती पसरावी. बियाणे २ सेंमी पेक्षा जास्त खोलवर जाणार नाही याची दक्षता घ्यावी. जेणेकरून बियाणे उगवण्यास समस्या येणार नाही. • बियाणे टाकल्या नंतर झाऱ्याच्या अथवा पंपाच्या साहाय्याने गादीवाफ्यावर पाणी द्यावे. मोकाट पाणी गादी वाफ्यावर सोडू नये अन्यथा बियाणे पाण्या बरोबर वाहून जाण्याची शक्यता असते. त्यानंतर त्यावर दोन दिवस सुतुळीचे पोते ओले करून टाकावे व त्यावरच पंपाच्या साहाय्याने पाणी शिंपडावे. पोते टाकल्यामुळे दमट वातावरण तयार होऊन बियाणे लवकर उगवण्यास मदत होईल. • पिकानुसार उदा. मिरची, टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी यांसारख्या पिकांचे बियाणे ८ ते १० दिवसांत बियाणे उगवून येते. • बियाणे उगवल्यानंतर सुरुवातीला काही कीड रोग यांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी एक आठवड्यात त्यावर बुरशीनाशक व कीटकनाशकाची फवारणी करावी. • त्याचबरोबर रोपांची जोमदार वाढीसाठी व जैविक व अजैविक ताण याविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी सिलिकॉन १ मिली/लिटर तसेच सशक्त रोप बनण्यासाठी चिलेटेड कॅशिअम @ १० ग्रॅम प्रति पंप घेऊन फवारणी करावी. • पुनर्लागवडीसाठी योग्य वयाची रोपे निवडावी जसे की मिरची ३५ दिवस, टोमॅटो २५ दिवस, काकडी/कलिंगड १८ दिवस. • कोणत्याही पिकाची चांगली वाढ, उत्पादन आणि सशक्तपणा असण्यासाठी चांगल्या प्रतीची रोपे निवडणे क्रमप्राप्त आहे, त्यामुळे वरील गोष्टींचा बारकाईने विचार आणि अंतर्भाव करणे फायदेशीर होईल.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
72
5
संबंधित लेख