कृषी वार्ताबी बी सी
शेत रस्त्यासाठी अर्ज नेमका कसा करायचा? जाणून घेऊया.
जमिनीची जसजशी विभागणी होत आहे, तसंतसं शेत रस्त्यांची मागणी वाढत आहे. आता आपण नवीन शेत रस्त्यासाठी अर्ज कसा करायचा, त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात, अर्ज केल्यानंतरची प्रक्रिया काय असते याची माहिती पाहणार आहोत. अर्ज कसा करायचा? शेतकऱ्याला स्वत:च्या शेतजमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल, तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६च्या कलम १४३ अन्वये नवीन रस्त्यासाठी अर्ज करता येतो. हा रस्ता शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधावरून दिला जातो. www.drdcsanjayk.info या वेबसाईटवर हे उपलब्ध आहे. हा अर्ज भरून झाला की या अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडावी लागतात. 1. अर्जदाराच्या जमिनीच्या आणि ज्या लगतच्या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे, त्या जमिनीचा कच्चा नकाशा 2. अर्जदाराच्या जमिनीचा चालू वर्षांतील (तीन महिन्याच्या आतील) सातबारा 3. लगतच्या शेतकऱ्यांची नावे, पत्ते आणि त्यांच्या जमिनीचा तपशील 4. अर्जदाराच्या जमिनीचा न्यायालयात काही वाद सुरू असेल तर त्याची कागदपत्रांसहित माहिती. एकदा का शेतकऱ्यानं अर्ज दाखल केला की अर्जदार आणि ज्या शेतकऱ्याच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे, त्या सर्वांना नोटीस काढून त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येते. तसंच अर्जदाराला शेतात जाण्यासाठी खरोखरच रस्त्याची आवश्यकता आहे काय, याची तहसीलदारांकडून प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करण्यात येते. ही प्रक्रिया पूर्ण झाली की तहसीलदार रस्ता मागणीच्या अर्जावर निर्णय देतात, आदेश पारित करतात. एक तर ते रस्ता मागणीचा अर्ज मान्य करतात किंवा फेटाळतात. अर्ज मान्य केल्यास लगतच्या हद्दीच्या बांधावरून रस्ता देण्याचा आदेश पारित केला जातो. त्यावेळेस लगतच्या शेतकऱ्याचे कमीत कमी नुकसान होईल, असं पाहिलं जातं. सामान्यपणे 8 फूट रुंदीचा रस्ता मंजूर केला जातो. म्हणजेच एका वेळेस एक बैलगाडी जाऊ शकेल, इतका रस्ता दिला जातो. पण, तहसीलदारांचा आदेश शेतकऱ्याला मान्य नसल्यास आदेश प्राप्त झाल्यापासून 60 दिवस म्हणजे दोन महिन्यांच्या आत उपविभागीय अधिकाऱ्याकडे अपील दाखल करता येते किंवा एका वर्षाच्या आत दिवाणी न्यायालयात दावा करता येतो. संदर्भ - २८ सप्टेंबर २०२० बी बी सी, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
249
17
संबंधित लेख