AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
02 Mar 20, 10:00 AM
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आंतरपीक घेताना घ्यावयाची काळजी
• आंतर पीक म्हणजे काय? तर एकापेक्षा अनेक पिके एकाच शेतात एकाच वेळी/हंगामात घेण्याच्या पद्धतीला आंतरपीक म्हणतात. • आंतरपीक घेतल्यामुळे दोन पिकाचे उत्पादन एकाच वेळी घेऊन नफा होतो. तसेच पिकास देणारे पाणी, खते, जमीन, सूर्यप्रकाश यांचा पुरेपूर वापर केला जातो. तसेच एखादे पीक जैविक किंवा अजैविक ताणामुळे खराब झाले तर दुसऱ्या पिकामुळे शेतकऱ्याचे जास्त नुकसान होत नाही तसेच जमिनीची धूप देखील आंतर पिकाने थांबवली जाते. • परंतु आंतर पिकाचे व्यवस्थापन योग्य न झाल्यास दोन्ही पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन आर्थिक तोटा होतो. दोन्ही पीक एकाच प्रकारच्या कीड, रोग व्हायरस ला बळी पडते. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवने कठीण जाते. मुख्य पिकाचे अन्नद्रव्ये, सूर्यप्रकाश, पाणी, जागा हे आंतरपिक म्हणून घेतलेल्या पिकाने घेतले तर मुख्य पिकाच्या उत्पादनात तुलनेत घट येते. तसेच पिकात आंतरमशागत करणे पिकाची एकाच वेळो काढणी आल्यास काढणी शक्य न होणे अश्या अनेक समस्या आंतरपिकात येतात.त्यामुळे आंतर पीक घेण्यापूर्वी खालील बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे 1. एकाच वर्गातील पिके आंतर पिके म्हणून निवडू नयेत. उदा. वेलवर्गीय पिकात वेलवर्गीय पीक घेणे. मिरची पिकात, टोमॅटो, वांगी, भेंडी. जेणेकरून पीक कीड व रोग यांना बळी पडणार नाही तसेच जमिनीची गुणवत्ता देखील खालावणार नाही. 2. जास्त कालावधीच्या पिकात कमी कालावधीच्या पिकाची निवड करणे. उदा. ऊस पिकात कोबी, फुलकोबी, कलिंगड भुईमूग, बटाटा. 3. जास्त खोलवर मुळे जाणाऱ्या पिकात कमी खॊलवर मुळे जाणारी पिकाची निवड करावी. जेणेकरून एकदल पिकांना द्विदल पिकांपासून नत्र मिळेल. उदा. भुईमूग, चवळी सोयाबीन, हरभरा यांसारख्या द्विदल पिकात मका, ज्वारी यांसारखी एकदल पिके घ्यावी. 4. पपई सारख्या पिकात मिरची, भेंडी किंवा इतर वेलवर्गीय पिकांची एकत्र लागवड करू नये. कारण ह्या सगळ्या पिकांचे रस शोषक कीड व व्हायरस रोगामुळे जास्त नुकसान होते. 5. शक्य झाल्यास सरळ व उंच वाढणाऱ्या पिकात बुटके व पसरट वाढणाऱ्या पिकाची निवड करावी. उदा. नारळ, सुपारी, साग यांसारख्या पिकात हळद, आले, मका, कांदा यांसारखी पिके घेतल्यास दोन्ही पिकास वाढीसाठी पुरेपूर जागा, हवा व सूर्यप्रकाश मिळतो. जेणेकरून दोन्ही पिकांपासून चांगले उत्पादन घेणे शक्य होते. 6. सुरुवातीच्या काळात बहार धरण्यापूर्वी लिंबूवर्गीय, डाळिंब, द्राक्षे, पेरू, सीताफळ यांसारख्या फळपिकात पालेभाज्या, सोयाबीन, भुईमूग, कांदा यांसारखी पिके घ्यावी. 7. आंतर पीक घेताना पिकात तणनाशकाचा वापर करणे टाळावे. जेणेकरून दुसऱ्या पिकाचे तणनाशकांमुळे नुकसान होणार नाही. 8. मुख्य पिकातील रस शोषक कीड, सूत्रकृमी यांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी झेंडू सारख्या पिकांची आंतर पीक म्हणून निवड करावी. 9. आंतरपीक म्हणजे मुख्य पिकाला सूर्यप्रकाश, अन्नद्रव्ये, पाणी व हवा यासाठी स्पर्धा असते. या बाबीचा विचार करून आपल्याला सर्वच नियोजनात आवश्यक ते बदल आणि वाढ करणे आवश्यक बाब आहे. या सर्व बाबी लक्षात घेतल्या तर नक्कीच अंतरपिकाचा फायदा शेतकऱ्यांना होईल संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
7
3