AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
10 Feb 20, 10:00 AM
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
डाळिंब फळ तडकणे: कारणे आणि उपाययोजना
महाराष्ट्रात कमी पाण्यात कोरडवाहु क्षेत्रात वरदान ठरलेल्या डाळिंब पिकामध्ये बऱ्याच प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये मर रोग, तेलकट डाग रोग, फळे तडकणे, उत्पादित आयुष्य कमी मिळणे, इत्यादी. राज्यातील बऱ्याच भागातील डाळिंब बागेत काही वर्षापासुन पक्व होणाऱ्या डाळिंब फळावर तेलकट चट्टे आणि फळे तडकण्याची विकृती मोठया प्रमाणावर आढळून येत आहे. साधारणपणे १५ ते २० टक्के नुकसान फळे तडकण्याने होते. फळे भेगाळल्याने फळांच्या वजनात आणि रसाच्या प्रमाणात घट होते. फळे तडकण्याची कारणे: • डाळिंब पिकात अयोग्य पाणी व्यवस्थापन, जमिनीची निवड, हवामानातील बदल, तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव इत्यादी. • जमिनीमध्ये नत्र, स्फुरद या मुख्य अन्नद्रव्यांबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम या दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरता तसेच बोरॉन या सूक्ष्मअन्नद्रव्याची कमतरता असणे. • हवेतील तापमान व आर्द्रतेत विशेषतः रात्र व दिवसातील तापमानात होणारी तफावत. • अवर्षणासारखी परिस्थिती जास्त कालावधीसाठी राहिल्यास फळांची साल कडक होते. अशा परिस्थितीत एकाएकी पाऊस झाल्यास किंवा भरपूर पाणी दिल्यास फळांच्या तडकण्याच्या प्रमाणात वाढ होते. उपाययोजना: 1. सूक्ष्मअन्नद्रव्ये उदा. जस्त, लोह किंवा बोरॉनची कमतरता असल्यास सूक्ष्मअन्नद्रव्ये स्लरीद्वारे उदा. एकरी २०० लिटर पाण्यामध्ये २५ किलो ताजे शेण + ५ लिटर गोमुत्र + ५ किलो फेरस सल्फेट + ५ किलो झिंक सल्फेट + २ किलो बोरिक एसिड एकत्र आठवडाभर मुरवून ७ व्या दिवशी झाडांना स्लरी दयावी. 2. फुले येण्यापुर्वी व ५०% फुले असताना झाडांवर चिलेटेड मिक्स मायक्रो न्युट्रीएंट ग्रेड - २ @ १ ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. 3. बागेत आच्छादनाचा वापर केल्यास तापमान व आर्द्रतेवर नियंत्रण राहील. 4. तांबड्या, हलक्या जमिनीत कॅल्शियम व बोरॉनचे प्रमाण कमी असल्यास चिलेटेड कॅल्शियम १ ग्रॅम + बोरॉन १ ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे फवारणी फुले आल्यावर व फळे लिंबाच्या आकाराची असताना करावी. तसेच ड्रीपद्वारे ५ किलो कॅल्शियम नायट्रेट २०० लिटर पाण्यातून एकरी फळ फुगवणीच्या काळात दोनदा सोडावे.
• संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
191
1