AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
04 Feb 20, 01:00 PM
कृषी वार्ताअॅग्रोवन
‘कोरोना’मुळे चीनमधील सूत, कापूस निर्यात थांबली
चीनमध्ये कोरोना विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याने मागील आठवडाभरापासून चीनला भारतातून होणारी सूत व कापसाची निर्यात थांबली आहे. यातच देशात शासकीय कापूस खरेदी बऱ्यापैकी झाल्याने बाजारातील दबाव दूर झाला असून, इतर देशांमधून सुताला चांगली मागणी असल्याने सुताचा कुठलाही साठा देशात शिल्लक नाही. भारतीय कापूस महामंडळ(सीसीआय) कोणत्या दरात कापूस गाठींची विक्री करेल, यावरच बाजाराची चाल अवलंबून असल्याची स्थिती आहे. भारतीय बाजारात खंडीचे (३५६ किलो रूई) दर ४० हजार रूपयांपर्यंत आहेत. हे दर मागील दोन महिन्यांपासून स्थिर आहेत. जानेवारीच्या सुरूवातीला चीनमधील कापूस निर्यातीने वेग घेतला आहे. देशातून यंदा ६० ते ६५ गाठींच्या निर्यातीचा अंदाज आहे. यात सुमारे सात लाख गाठींची निर्यात चीनमध्ये झाली. अमेरिका व चीनमधील व्यापार युद्ध सुरूच असल्याने चीनने भारतासह ऑस्ट्रेलियाशी गाठींच्या खरेदीचे आणखी सौदे केले होते. परंतु, मागील ८ ते १० दिवसांत कोरोना विषाणूची समस्या तीव्र झाली आहे. तेथे या समस्येवर मात करता न आल्याने व्यापारही थांबला आहे. त्यात गाठी, सूत आयातीवरही परिणाम झाला आहे. संदर्भ - अ‍ॅग्रोवन, ४ फेब्रुवारी २०२०
59
23