कृषि वार्ताअॅग्रोवन
आता पशुवैदयकीय सेवा अॅपव्दारे मिळणार
पुणे – पशुधनाला तातडीने व दर्जेदार पशुवैदयकीय सेवा आता अॅपव्दारे मिळणार असून, पशुवैद्यकीय दवाखान्यांमधील पारंपारिक पध्दतीने ठेवण्यात येणारी पशुवैदयकीय सेवांच्या नोंदीची विविध १८ रजिस्टरदेखील आता बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
पारंपारिक पशुवैदयकीय सेवा आता ऑनलाइन आणि अत्याधुनिक करण्यासाठी विशेष अॅप विकसीत करण्यात येत आहे. या अॅपव्दारे पशुपालक व शेतकऱ्यांनी आपल्याकडील विविध पशुधनाची नोंद करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. या अॅपवर संबंधित पशुवैदयकीय, दवाखाना व अधिकाऱ्यांचीदेखील नोंद असणार आहे. पशुधनाला झालेल्या आजाराची नोंद शेतकऱ्यांनी अॅपवर करायची आहे. यानंतर संबंधित पशुवैदयकीय अधिकारी पशुधनावर उपचार करणार असून, केलेल्या उपचाराची नोंद या अॅपवर करणार आहे. यामुळे संबंधित पशुधनाच्या आजार केलेला औषधोपचार यांचा इतिहास तयार होणार आहे. यामुळे भविष्यात उपचार करताना, संबंधित पशुवैदयकीय अधिकाऱ्याला आजाराची माहिती मिळणार आहे. तसेच पशुधनाला अधिकच्या उपचारासाठी दवाखान्यात आणल्यानंतर व्यक्तींप्रमाणे त्यांची संगणकीय नोंद होणार असून, त्याला एक विशिष्ट कोड क्रमांक देण्यात येणार आहे. हा कोड त्या पशुधनाची ओळख असणार असून, भविष्यात कायमस्वरूपी सेव्ह असणार आहे, असेही आयुक्त मिश्रा यांनी सांगितले. संदर्भ – अॅग्रोवन, २९ जून २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
5
0
संबंधित लेख