कृषि वार्ताअॅग्रोवन
पाहा, राज्यात कुठे उन्हाळी पिकांची पेरणी झाली
पुणे: गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून उन्हाळी हंगामातील पिकांच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. मात्र, या पेरण्यांना पाणी टंचाईचा फटका बसू लागला आहे. पुणे विभागात उन्हाळी पिकांचे सरासरी क्षेत्र २३ हजार ३०० हेक्टर असून, त्यापैकी ५८४७ हेक्टर म्हणजेच २५ टक्के क्षेत्रावर आतापर्यंत पेरण्या झाल्या आहेत. यात प्रामुख्याने उन्हाळी बाजरी, मका, भुईमूग या पिकांचा समावेश असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. सध्या विभागातील नगर जिल्ह्यात रब्बी हंगामातील गहू पिकाची काढणी पूर्ण होत आली आहे. जिल्ह्यामध्ये उन्हाळी हंगामातील उन्हाळी मका व भुईमूग या पिकांच्या पेरणीस सुरवात झाली असून, पेरणी झालेली पिके वाढीच्या अवस्थेत आहे. जिल्ह्यातील श्रीगोंदा, संगमनेर या तालुक्यांत पेरणी झालेली आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये रब्बी गव्हाची काढणी पूर्णत्वास आली आहे. उन्हाळी हंगामातील उन्हाळी बाजरी व भुईमूग या पिकांच्या पेरणीस सुरवात झाली आहे. काही ठिकाणी बाजरी, भुईमूग ही पिके वाढीच्या अवस्थेत आहे. जिल्ह्यात हवेली, भोर, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड या तालुक्यांत पेरणी झाली आहे. सोलापूरमध्ये गव्हाची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये उन्हाळी हंगामातील उन्हाळी मका व भुईमूग ही पिके वाढीच्या अवस्थेत आहे. जिल्ह्यात उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, पंढरपूर, माळशिरस तालुक्यात काही प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. संदर्भ – अॅग्रोवन, २ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
5
0
संबंधित लेख