AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
14 Feb 19, 06:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
पाहा, ‘मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना’
मुंबई: राज्याच्या दुर्गम भागात पशुरुग्णांसाठी २०१८-१९ या वर्षापासून ‘मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना’ सुरू करण्यास राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ८० तालुक्यांमध्ये फिरते पशुचिकित्सा पथक सुरू करण्यासदेखील सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता, शेतकऱ्यांना जनावरांच्या आरोग्याची काळजी करण्याची चिंता भासणार नाही. राज्याच्या दुर्गम भागात राहणाऱ्या पशुपालकांना आपल्या पशुरुग्णांवरील उपचारासाठी बऱ्याचदा आर्थिक भार परवडणारा नसतो. त्यामुळे पशुवैद्यकीय सेवेअभावी पाळीव जनावरांचा मृत्यू होऊ शकतो. तसेच केंद्र शासनाने लाळ्याखुरकूत रोगमुक्त प्रदेशासाठी महाराष्ट्र राज्याची निवड केलेली आहे. त्यामुळे पशुरोगांचे प्रभावी नियंत्रण करणे आवश्यक आहे. या बाबी विचारात घेऊन, राज्याच्या दुर्गम भागासह पशुधनाच्या तुलनेत पशुवैद्यकीय दवाखान्याची संख्या कमी आणि दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा असणाऱ्या तालुक्यांमध्ये मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना राबविण्यात येणार आहे.
या फिरत्या पशुचिकित्सा पथकासाठी विशेष तयार केलेली ८० वाहने आणि आवश्यक ती उपकरणे खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या पथकांसाठी उपलब्ध मनुष्यबळातून पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. मात्र, मनुष्यबळ कमी असल्यास ठराविक कालावधीसाठी सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रचलित धोरणानुसार मानधनावर नियुक्ती करण्यासदेखील मान्यता देण्यात आली आहे. अशा अनेक सुविंधाच्या माध्यमातून एकूण १६ कोटी ७४ लाख एवढ्या खर्चास या योजनेसाठी मान्यता देण्यात आली आहे. संदर्भ – अॅग्रोवन, १३ फेब्रुवारी २०१९
3
5