AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
05 Feb 19, 05:00 PM
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
राज्यात थंडीचे प्रमाण जास्त-कमी
राज्यावर १०१६ हेप्टापास्कल, उत्तरेकडील राज्यावर १०१८ हेप्टापास्कल व पश्चिम विदर्भावर तितकाच हवेचा अधिक दाब राहणार आहे. त्यामुळे तेथे किमान तापमानात घसरण होऊन थंडीची तीव्रता जाणवेल. दक्षिण-पश्चिम राज्यात व मराठवाडयात थंडीचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे राहील. १० फेब्रुवारीला राज्यात थंडीचे प्रमाण कायम राहील. ११ फेब्रुवारीला राज्यात पश्चिमेकडील भागावरील हवेचे दाब कमी होऊन ते १०१४ हेप्टापास्कल इतके राहील्यामुळे थंडीचे प्रमाण कमी होईल.
कृषी सल्ला: १.उन्हाळी बाजरीची लागवड करा – कमी पाणी लागणारे बाजरी हे एक उत्तम पीक आहे. हेक्टरी केवळ २५० मिमी इतक्या कमी पाण्यावर हे पीक येऊ शकते. बागायत क्षेत्रात उन्हाळी हंगामात बाजरी पिकाचे क्षेत्र वाढत आहे. २.उन्हाळी भुईमूगाची पेरणी करावी – उन्हाळी हंगामात भुईमूगाचे उत्पादन दीडपट येते. बेवड म्हणून भुईमूगाचे पीक उत्तम असते. बाजारात याचे विविध जातींचे बियाणे उपलब्ध आहेत. ३.उन्हाळी हंगामात कलिंगड व खरबूज लागवड फायदयाची – शुगरबेबी, अकिरा, आरका, ज्योती, आऱका माणिक या टरबूजाच्या उत्तम जाती आहेत. यासाठी हेक्टरी ३ किलो बियाणे लागतात. ४.पपईची लागवड फायदयाची – उन्हाळी हंगामात भरपूर सुर्यप्रकाश व चांगले तापमान असते. पाण्याची निचरा होणारी जमीन लागवडीसाठी निवडावी. बियापासून गादीवाफ्यावर रोपे तयार करावीत. ५.भेंडीची लागवड फायदयाची – उन्हाळी हंगामात भरपूर सुर्यप्रकाश व चांगले तापमान लाभते त्यामुळे भेंडी पिकास कीड व रोगाचा प्रादुर्भाव फारसा होत नाही. ६.कार्ली लागवड फायदयाची – उन्हाळी हंगामात वेलवर्गीय पिकांची वाढ चांगली होते. भरपूर सुर्यप्रकाश व योग्य तापमान मिळाल्याने वाढ चांगले होते. संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे.
12
4