कृषि वार्ताअॅग्रोवन
राज्यातील तीस कारागृहांत शेती बहरू लागली!
पुणे: तुरूंगातील कैदयांच्या माध्यमातून राज्यातील ३० कारागृहांतील शेती बहरली असून, यंदा तब्बल पाच कोटींचे उत्पन्न मिळणार असल्याची माहिती कारागृह मुख्यालयातील शेतीप्रमुख संजय फडतरे यांनी दिली. राज्यातील ५४ कारागृहांपैकी पैठण खुले कारागृह, विसापूर, येरवडा मध्यवर्ती आणि खुले कारागृह, कोल्हापूर, नाशिक,अमरावती, नागपूर, मोर्शी, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, आटपाडी आदी ३० कारागृहांच्या आवारात बंदींमार्फत शेती करण्यात येते. सोयाबीन, भात, ज्वारी, तूरडाळ, ऊस, तसेच पालेभाज्या, फळभाज्या यात पिकविल्या जातात. त्या-त्या कारागृहात उत्पादित होणारे पीक, फळभाज्या तेथे वापरल्या जातात. उर्वरित नजीकच्या कारागृहांत पाठविले जाते.
राज्य सरकारने कारागृह प्रशासनाला नुकताच १७ लाख रुपयांचा निधी दिला आहे. तत्पूर्वी मिळालेल्या निधीमुळे ३० पैकी २५ कारागृहांत प्रशासनाने स्वतःचे ट्रॅक्‍टर खरेदी केले आहेत. यासाठी राज्य सरकारने कारागृह विभागात ९ कृषी पर्यवक्षेक, १६ कृषी सहायक नियुक्त केले आहेत. तसेच कारागृहातील शेती कुशल बंद्यांला ६१ रुपये प्रतिदिन, अर्धकुशल बंद्याला ५५ रुपये, तर अकुशल बंद्याला ४४ रुपये प्रतिदिन मजुरी मिळते. येथील शेतीवर होत असलेला खर्च आणि मिळणारे उत्पन्न याचा विचार केल्यास ही शेती कायमच फायद्यात राहिली आहे. त्यामुळे अन्नधान्य-भाजीपाल्यावरील खर्चात राज्य सरकारची मोठी बचत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. संदर्भ - अॅग्रोवन, २६ जानेवारी २०१९
0
0
संबंधित लेख