AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
11 Jan 19, 06:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
अखेर सात लाख टन साखर निर्यात होणार!
पुणे : राज्यातील बॅंकांनी निर्यातीसाठी आपल्या ताब्यातील तारण साखर देण्यास अखेर होकार दिला आहे. बॅंकांनी आपली भूमिका बदलल्यामुळे राज्यात पडून असलेली किमान सात लाख टन साखर निर्यात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती साखर उद्योगातून देण्यात आली.
कच्च्या साखरेची निर्यात १९०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दराने निर्यातदारांच्या ताब्यात द्यावी लागणार होती. मात्र, बॅंकांनी या साखरेचा भाव २९०० ते ३००० रुपये दर गृहीत धरून कारखान्यांना कर्ज दिले आहे. कर्जापोटी तयार साखर बॅंकांकडे गहाण आहे. गहाण असलेला माल कमी दराने देण्यास बॅंकांनी साफ नकार दिला होता. मात्र, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघाने शिखर बॅंकेकडे या समस्येसाठी जोरदार पाठपुरावा करून समस्येवर तोडगा काढला आहे. या व्यवहारात तयार होणाऱ्या अपुऱ्या दुराव्याची रक्कम कर्ज रुपात देण्यास शिखर बॅंक तयार झाली आहे. त्यामुळे ५१ साखर कारखान्यांची साखर निर्यात करण्याबाबत शिखर बॅंकेने तोडगा काढला आहे. राज्यातील इतर ५१ कारखान्यांची साखर विविध जिल्हा बॅंकांच्या ताब्यात आहे. या बॅंकांनीदेखील शिखर बॅंकेचा फॉर्म्युला वापरण्याचे ठरविले आहे. त्यामुळे १८५ पैकी किमान १०२ कारखान्यांची निर्यात होण्यात आता अडचण राहिलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. संदर्भ- अॅग्रोवन, ६ जानेवारी २०१९
3
1