AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
09 Jan 19, 05:00 PM
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
या आठवडयात थंडी कमी-जास्त प्रमाणात
महाराष्ट्राच्या सहयाद्री पर्वतरांगापासून पूर्वेस १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. मागील आठवडयापेक्षा या आठवडयात थंडीचे प्रमाण कमी होईल, मात्र पहाटे थंडी जाणवेल व दुपारी ही थंड हवामान राहील. कारण हवेचे दाब कमी होत असल्यामुळे किमान व कमाल तापमानात थोडया प्रमाणात वाढ होण्यास सुरूवात होत आहे. १२ व १३ जानेवारीला ही स्थिती कायम राहील, मात्र १४ जानेवारीला हवेच्या दाबात पुन्हा वाढ होईल त्यामुळे थंडीचे प्रमाण पुन्हा वाढेल.
कृषी सल्ला: १. ऊसाची लागवड करावी - या पिकाची लागवड १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत करावी. लागवडीपूर्वी एक नांगराची पाळी देऊन जमिनीची पूर्व मशागत करावी. २. भेंडी लागवड फायदयाची - फुले उत्कर्षा, अर्का अनामिका,विमुक्ता,अर्का अभय या भेंडी पिकाच्या उत्तम जाती आहेत. या पिकाची लागवड जानेवारीच्या १५ तारखेनंतर करावी. ३. वालाची लागवड फायदयाची – फुले गौरी, अश्र्वणी या उंच वाढणाऱ्या जाती असून, लागवड ताटी पध्दतीने करावी. फुले सुरूची व कोकण भूषण या बुटक्या जात आहेत. ४. कार्ली लागवड फायदयाची – फुले ग्रीन गोल्ड, हिरकणी या उत्तम जाती आहेत. सद्या या जातीचे वाण नवनवीन कंपन्यांनी बाजारात आणले आहेत. या पिकाची लागवड १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत करावी. ५. काकडीची लागवड फायदयाची – हिमांगी फुले व शुभांगी या विदयापीठांच्या जाती उत्तम आहेत. या पिकाशिवाय अनेक कंपन्यांच्या विविध जाती बाजारात आहेत. ६. उन्हाळी हंगामातील भूईमूग लागवड दुहेरी फायदयासाठी – या पिकाच्या लागवडीपूर्वी हेक्टरी २० ते २५ बैलगाडया शेण खत घालावे व ते कुळवाच्या पाळीने जमिनीत मिसळावे. दोन ओळीतील अंतर ३० सेंमी ठेवून बियांची पेरणी करावी. संदर्भ – ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे
5
3