AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
27 May 19, 06:00 PM
कृषी वार्ताअॅग्रोवन
पहिल्यांदा जलवाहतुकीद्वारे साडेचौदा टन आंबा इंग्लंडला निर्यात
मुंबई : पहिल्यांदाच जलवाहतुकीद्वारे मुंबईहून साडेचौदा टन केशर आणि बदाम आंबा इंग्लंडला निर्यात करण्यात आला आहे. वातावरण नियंत्रित करून फळाचे टिकवणक्षमता वाढवता येणाऱ्या आधुनिक तंत्राच्या साह्याने ही निर्यात करण्यात आली आहे. आतापर्यंत फक्त हवाई वाहतुकीमार्गे आंबा निर्यात केला जात होता. मात्र आता या नव्या तंत्रामुळे निर्यातदारांना दीर्घ अंतरावरील जलवाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.
या निर्यातीसाठी कंट्रोल अॅटमॉस्फियर रिफर टेम्प्रेचर या वातावरण नियंत्रित करणाऱ्या अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. या तंत्रामुळे मुंबईहून इंग्लंडला जल वाहतुकीमार्गे आंबा पोचण्यासाठी सुमारे तीन आठवड्यांचा कालावधी जातो, अशा लांब पल्ल्याच्या, दीर्घकालीन वाहतुकीचा विचार करून जहाजामार्गे आंबा पाठवायचा असेल, तर त्यासाठी या आधुनिक तंत्राचा वापर केला जातो. जेणेकरून आंबा पोचल्यानंतर ते फळ खाण्यायोग्य अवस्थेत ग्राहकांपर्यंत पोचवता येते. या सगळ्या प्रक्रियेत आंब्याच्या दर्जावर कोणताही परिणाम होत नाही. फळाची चव, दर्जा कायम राहतो. या आधुनिक तंत्राचा वापर करून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतून पहिल्यांदाच आंब्याचा कंटेनर रवाना झाला. सध्या गुजरातचा केशर आणि आंध्र प्रदेशचा बदामी आंबा पाठवण्यात आला आहे. दोन्ही मिळून सुमारे साडेचौदा टन आंबा इंग्लंडला निर्यात करण्यात आला आहे. हवाई वाहतुकीच्या तुलनेत जलवाहतुकीचा खर्च कमी असतो. आंब्याचे दरही मर्यादित राहू शकतात. मॉक्सलाइन शिपिंग कंपनीच्या मुंबई ते इंग्लंड जल वाहतूक सेवेच्या माध्यमातून आंब्याचा हा पहिला कंटेनर इंग्लंडला येत्या दोन दिवसांत रवाना होणार आहे. पुढील २१ दिवसांत हे जहाज इंग्लंडला पोचेल. संदर्भ – अॅग्रोवन, २३ मे २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
46
0