AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
16 Dec 19, 10:00 AM
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
चांगल्या प्रतीच्या कांदा बीजोत्पादनासाठी महत्वाचे नियोजन
 कोणत्याही वाणाची उत्पादन क्षमता ही त्यामध्ये असलेल्या अनुवांशिक गुणधर्मावर अवलंबून असते त्यामुळे हि उत्पादन क्षमता टिकवून ठेवायची असेल तर त्यामध्ये बीजोत्पादन करताना कोणत्याही प्रकारे भेसळ होणार नाही याची काळजी घ्यावी..  कांद्याचे बीज उत्पादन घेण्यासाठी कंदाची लागवड चांगल्या पाण्याचा निचरा होणाऱ्या व भारी जमिनीत करावी. कांदा बीजोत्पादनासाठी थंड वातावरण लागते.  कंदाची निवड:- कांदा काढणी नंतर ६ महिने जुना झालेला कांदा लागवडीसाठी निवडावा. एकसारख्या मध्यम आकाराचे, रंगाचे आणि वजनाचे कंद निवडावे. ५ ते ७ सेंमी व्यासाचा, ५० ते ८० ग्रॅम वजनाचा व एकच गाभा असणारा कांदा निवडावा. दुभाळका कांदा बीजोत्पादनासाठी घेऊ नये.  लागवडीपूर्वी निवडलेल्या कांद्याचा पातीच्या बाजूचा १/३ भाग कापून त्याला बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. कांद्यामध्ये सगळ्यात जास्त परपरागीभवन होत असल्या कारणाने यामध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. म्हणून दोन कांदा बीजोत्पादन प्लॉटमधील अंतर ५०० ते १००० मीटर पेक्षा जास्त असावे. व लागवड ही ४५*३० सेंमी अंतरावर सरी वरंभा अथवा सपाट वाफा करून करावी.  कांदा पिकात परपरागीभवन होत असल्यामुळे परागीभवनामध्ये मधमाशीचा महत्वाचा वाटा आहे. परंतु कांद्याच्या फुलांचा रंग सफेद असल्याकारणाने मधमाशी जास्त प्रमाणात आकर्षित होत नाही. यासाठी शेतात झेंडू, शेवंती यांसारख्या पिकाची आंतरपीक म्ह्णून लागवड करावी तसेच कांदयाला फुले लागण्याच्या अवस्थेनंतर रासायनिक कीटकनाशकांचा व बुरशीनाशकांचा वापर करणे टाळावा. जेणेकरून मधमाशींद्वारे परागीभवन चांगले होईल.  पाणी व्यवस्थापनासाठी शक्यतो ठिबक अथवा पाट पाणी द्यावे. तुषार सिंचनाचा वापर करणे टाळावा. तसेच खतांचे व तणव्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे  ढगाळ हवामानात बियाण्याची चांगली गुणवत्ता येत नाही. यासाठी फुले लागल्यानंतर चिलेटेड कॅल्शियम @ ०. ५ ग्रॅम, बोरॉन @ १ ग्रॅम आणि प्लॅनोफिक्स @ ०.२५ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. यामुळे फुलात बियाणे चांगले भरले जाऊन गुणवत्ता सुधारेल.  बीजोत्पादनात फुलकिडे, मावा तसेच करपा कंदकूज/सड यांसारख्या समस्या येतात परंतु यासाठी वेळीच फुले लागण्यापूर्वीच नियोजन करावे. वाढीच्या अवस्थेत प्लॉट नेहमी पाहणी करावी व रोगी तसेच दुभाळके असलेले झाडे फुलोरा अवस्थेपूर्वीच काढून टाकावे.  लागवडी नंतर फुलांची काढणी साधारणतः ३ महिन्यांमध्ये चालू होते एकाच वेळी काढणी न करता जसे जसे फुल पक्व होईल तसे २ ते ३ टप्प्यात फुलांची काढणी करावी. गुणवत्ता पूर्ण बीज उत्पादनासाठी यापद्धतीने नियोजन करणे गरजेचे आहे. संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
292
12