Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
07 Sep 19, 06:30 PM
जैविक शेतीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन
अमेरिकन लष्करी अळी ही अमेरिकेतील मका पिकावर उपजीविका करणारी कीड असून, या किडीचा प्रादुर्भाव जून २०१८ पासून भारतातील दक्षिणेकडील राज्यात दिसला आहे. या किडीमुळे मागील वर्षात खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामातील तसेच चा-याच्या मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या सर्वत्र उशीरा झालेल्या पावसामुळे मकाची लागवड काहीशी उशीरा झालेली आहे. येत्या हंगामात महाराष्ट्रासह सर्वच मका उत्पादक राज्यांमध्ये पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. या किडीच्या व्यवस्थापनासाठी सर्व समावेशक एकात्मिक कीड नियंत्रणाचे उपाय सामूहिकरित्या करणे काळाची गरज आहे.
लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन मक्याच्या बाजूने नेपिअर गवताची सापळा पीक म्हणून लागवड करावी. मका पिकाची पेरणी झाल्यानंतर लगेचच शेतीमध्ये एकरी दहा पक्षी थांबे उभारावेत. मक्याच्या पानावर दिसणारे अंडीपुंज व सुरुवातीच्या अवस्थेतील अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. किडीच्या सर्वेक्षणासाठी पेरणीनंतर पीक उगवून येण्यापूर्वी एकरी पाच कामगंध सापळे लावावेत. लष्करी आळीचे नर पतंग मोठ्या प्रमाणात पकडण्यासाठी एकरी १५ कामगंध सापळे लावावेत. सुरुवातीच्या अवस्थेत अळी नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडीरेक्टिन ५० मिलि प्रति १० लिटर पाणी फ़वारणी करावी. जैविक कीटकनाशकांमध्ये नोमुरिया रिलाई ५० ग्रॅम किंवा मेटा-हाझियम अॅनीसोप्ली ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बॅसिलस थुरिंजेनसिसची देखील फ़वारणी फ़ायदेशीर ठरते. कीटकनाशकांची फवारणी करताना फवारा मक्याच्या पोंग्यात जाईल याची काळजी घ्यावी. इमामेक्टिन बेन्झोएट ५ एस.जी. ४ ग्रॅम किंवा थायोमिथोक्झाम १२.६ % + लॅम्बडा सायहॉलोथ्रीन ९.५ झेड सी ५ मिली किंवा स्पिनेटोरम ११.७ एस सी ४ मिली किंवा क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५ एस सी ४ मिली या कीटकनाशकांची प्रति १० लिटर पाण्यासाठी फ़वारणी करावी. श्री.तुषार उगले, कीटकशास्त्रज्ञ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
143
0