Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
26 Sep 19, 06:00 PM
कृषि वार्ताद इंडियन एक्सप्रेस
अमेरिकन लष्करी अळी आता कपाशीवरही!
नगर – अमेरिकन लष्करी अळीने मका पिकात सर्वत्र हाहाकार उडवलेला असतानाच राज्याचे प्रमुख खरीप पीक असलेल्या कपाशी पिकातही या किडीने आता शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. नगर जिल्हयात पाथर्डी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या मक्याच्या शेताला लागून असलेल्या बीटी कपाशीत बोंडे व फुलांवर या अळीने आक्रमण केले आहे. या शेतीतील सुमारे २० ते ३० टक्के कपाशीवर या अळीचा २० ते ४० टक्के प्रादुर्भाव आढळला असून काही बोंडात अळीने प्रवेश केल्याने गांभार्य अधिकच वाढले आहे. कपाशी पिकातील या अळीची महाराष्ट्रातील ही पहिलीच नोंद असावी, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
अमेरिकन लष्करी अळी या किडीने संपूर्ण मका पिकावर महाराष्ट्रात रूद रूप धारण केले आहे. मका हे या किडीचे मुख्य लक्ष्य असले तरी राज्यातील ऊस, ज्वारी, बाजरी, नाचणी, आदी तृणधान्य पिकांमध्येही या अळी कमी-जास्त प्रमाणात आढळून आली आहे. पाने, खोडांपासून ते कणसांपर्यंत कोणताही भाग खाण्यापासून शिल्लक न ठेवणाऱ्या या अळीच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकऱ्यांना आपले प्लॉट सोडून देण्याची किंवा उपटून टाकण्याची वेळ आली आहे. आता, या अळीने तृणधान्यांव्यतिरिक्त कपाशीसारख्या नगदी पिकातही शिरकाव केला आहे. महात्मा फुले कृषी विदयापीठाच्या कापूस सुधार प्रकल्पातील कीटकशास्त्रज्ञ नंदकुमार भुते यांनी सांगितले की, मका शेजारीच कपाशीचा प्लॉट होता. अळीच्या मोठया प्रादुर्भावामुळे रोटोव्हेटर फिरवून या शेतकऱ्याने मका काढून टाकला. मात्र, मक्यावरील अळी शेजारच्या कपाशी पिकात स्थलांतरित झाली. कपाशी हे पर्यायी पीक तिला मिळाले, तसेच ते पाते, फुल, बोंडे अवस्थेत असल्याने तिला खादय मिळाले. रिमझिम पाऊस, आर्द्रता अळीच्या वाढीच्या पोषण ठरले. मका काढणीनंतर ही अळी यजमान पिकात जाण्याची शक्यता आहे. संदर्भ – द इंडियन एक्सप्रेस, २४ सप्टेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
102
0