AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
07 Jun 19, 01:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
देशात फलोत्पादन पिकांचे विक्रमी उत्पादन
नवी दिल्ली: यंदा देशात फलोत्पादन पिकांचे उत्पादन मागीलवर्षीच्या तुलनेत वाढणार आहे. फळे आणि मसाले उत्पादनात वाढ होणार असल्याने २०१८-१९ मध्ये देशात विक्रमी ३१४.८७ दशलक्ष टन फलोत्पादन पिके उत्पादनाचा अंदाज आहे. हा आतापर्यंतचा उत्पादनाचा उच्चांक असेल, असे केंद्रीय कृषी विभागाने म्हटले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने नुकताच फलोत्पादन पिके उत्पादनाचा दुसरा सुधारित अंदाज जाहीर केला आहे. देशात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात एक टक्क्याने वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी देशात कमी पाऊस झाला असतानाही ३११.७१ दशलक्ष टन फलोत्पादन पिकांचे उत्पादन झाले होते.
कृषी विभागाने सुधारित अंदाजात यंदा फळे उत्पादन ९७.३८ दशलक्ष टन होणार असल्याचे म्हटले आहे. पहिल्या अंदाजात ९६.७५ दशलक्ष टन उत्पादन होणार असल्याचे म्हटले होते. पहिल्या अंदाजात मसाले उत्पादन ८.६१ दशलक्ष टन होणार असल्याचा अंदाज जाहीर केला होता. सुधारित अंदाजात ८.५९ दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. सुधारित अंदाजात मसाले उत्पादन घटणार असल्याचे म्हटले आहे. सोबतच भाजीपाला उत्पादनातही घट होऊन १८७.४७ दशलक्ष टनांवरून १८७.३७ दशलक्ष टन उत्पादन होणार असल्याचे म्हटले आहे. संदर्भ – अॅग्रोवन, ४ जून २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
20
0